कडोली: प्रतिनिधी
दि.६: पत्रकार दिनानिमित्त वारणा नगर येथील स्थानिक पत्रकार आणि राज्य स्तरीय पत्रकार संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके आणि जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. असोसिएशन ऑफ स्मॉल अंड मीडियम न्यूज़ पेपर्स ऑफ इंडिया चे राष्ट्रीय सचिव तसेच वारणेचा वाघ या साप्ताहिकाचे संपादक प्रवीण पाटील यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ग्रामीण पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ग्रामीण भागातील प्रश्न मांडण्यासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी स्थानिक आणि लघु वृत्तपत्रे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. साप्ताहिक वारणेचा वाघ व वारणा कोडोली पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी वारणा कोडोली परिसरातील ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाटील ( तरुण भारत), संजय पाटील (दैनिक सकाळ), आनंदा वायदंडे (दैनिक लोकमत), प्रवीण पाटील (साप्ताहिक वारणेचा वाघ), संजय भोसले ( दैनिक पुढारी), राजकुमार जाधव (बी न्यूज), शिवकुमार सोने (दैनिक पुण्यनगरी) बाबासो कावळे (दैनिक पुढारी), विलास पाटील (दैनिक महान कार्य ) बाबासो माने(दैनिक पुण्यनगरी), रवींद्र पवार (दैनिक लोकमत) बाबासो जाधव (साप्ताहिक शांती टाइम्स) सनी काळे( के.के. न्यूज ) उपस्थित होते.विशेष म्हणजे, या संवाद कार्यक्रमात बदलत्या काळातील पत्रकारिता आणि तंत्रज्ञान यावर भर देण्यात आला. आजच्या डिजिटल युगात पत्रकारितेवर होणारा ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अर्थात ‘एआय’चा प्रभाव आणि त्याचा वापर या विषयावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला. उपसंचालक प्रवीण टाके आणि जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी पत्रकारांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याबाबत आणि शासकीय योजनांच्या प्रसिद्धीबाबत मार्गदर्शन केले. या आगळ्यावेगळ्या संवाद उपक्रमाचे स्थानिक पत्रकारांनी स्वागत केले आहे.