रत्नागिरी – सिद्धेश मराठे
वर्षानुवर्षे न्यायालयामध्ये वादविवाद प्रलंबित असतात. यामुळे आपल्या देशामध्ये वादाचे संकट सामाजिक स्वास्थ्यावर पडताना दिसून येते. वेगवेगळया प्रकारचे वाद न्यायालयात प्रलंबित राहतात. वादावर तोडगा निघत नसल्यामुळे विलंबामुळे न्यायाच्या उद्देशाला तडा जातो. जास्त संख्येने प्रलंबित असलेले वाद यामुळे न्याययंत्रणेवरसुध्दा ताण येतो आणि त्यामुळे निर्णय प्रक्रियेला विलंब होतो. प्रलंबित असलेला वाद हा दोन्ही पक्षकारांच्या हिताचा नसताे. केवळ आर्थिक किंवा वेळेचा अपव्यय तेवढयापुरताच हा प्रश्न मर्यादित राहिला नसून मानसिक ताण-तणाव यामुळे होणारी हानी ही पैशाच्या स्वरुपातसुध्दा भरुन काढता येणारी नसते. विलंब म्हणजे प्रत्यक्षात न्याय नाकारण्यासारखेच असते. त्याच पाश्र्वभूमीवर वैकल्पीक वाद निवार हा पर्याय नसल्याने उपलब्ध करुन दिला आहे. त्याचा फायदा दिनांक २५ सप्टेंबर २०२१ रोजी अायोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये हजारो पक्षकारांनी घेतला.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार २५ सप्टेंबर रोजी अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री. एम.क्यु.एस.एम.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लाेकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. लोकअदालतमध्ये जिल्हयाभरातून २९९० न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे अाणि १४८९१ वादपूर्व प्रकरणे दाखल करण्यात आली हाेती. सदर लोकअदालमध्ये ३२४९ प्रकरणांमध्ये निवाडा होऊन वाद संपुष्टात आले. एकूण ८,५५,३७,१६०/- (रक्कम रुपये आठ कोटी पंचावन्न लाख सदतीस हजार एकशे साठ मात्र) एवढया रकमेची वसुली अाणि वाद सांमजस्याने निर्णीत झाले.
मोठया संख्येने प्रकरणे विधी सेवा प्राधिकरणकडे दाखल झाल्यामुळे लोकन्यायालयापूर्वी सतत पाच दिवस पूर्वबैठकांचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वबैठकांच्या दरम्यान विशेष प्रशिक्षण दिलेले एस.बी.कीर विधी महाविदयालयाचे विदयार्थी अमित वायकुळ, अथर्व देसाई, पूर्वा जोगळेकर, सिध्दी शिंदे, दिव्या लिंगायात, अवंती गुरव, आश्वीनी कदम, कृपा परुळेकर, सलोनी शेडगे, रिया माने, निलम शिंदे, शांभवी पाटील, निरायम साळवी, तन्मय दाते यांनी वकील क्षेत्रात पाय ठेवण्या अगोदर लोकांचे वाद समजून घेउन समुपदेशन उपक्रमात आणि लोकन्यायालयाच्या दिवशी लोकांना सहकार्य करण्यास मोलाचा सहभाग दिला. त्यामुळे सामंजस्याने वाद निवारण माेठया संख्येने करणे शक्य झाले.
लोक न्यायालयामध्ये अशा प्रकारचे निर्णय करताना करताना कोणतेही न्यायालयीन शुल्क दयावे लागत नाही. वकिल फी, न्यायालयात येण्या-जाण्याचा खर्च, अन्य खर्च आणि वेळेची बचत झाल्याचा आनंद पक्षकारांना चेह-यावर दिसत होता. अनेक जणांचे संसार पुन्हा जुळले, अनेक महिलांना वाद न करताच स्त्रीधन, पोटगी, मालमत्तेतील हक्क याबाबतचे आदेश मिळवता आले. विशेष म्हणजे जिंकलो किंवा हरलो हा भाव पक्षकारांमध्ये राहिला नाही. आपल्यावर निर्णय लादला गेला ही भावनासुध्दा त्यांच्यामध्ये नव्हती. लोकअदालत ही लवचिक प्रक्रिया असून त्यावर पक्षकारांचे नियंत्रण असते. परिस्थितीला अनुसरुन त्यामध्ये निवाडा घेता येतो. अनेक पक्षकारांमधील दुरावा, नातेसंबंध स्नेहात बांधले गेले. वादाचा निर्णय जलद आणि मैत्रीपूर्ण वातावरणात झाला. त्यामुळे पक्षकारांची आर्थिक हानी झाली तर नाहीच त्याचबरोबर त्यांना मानसिक आणि आत्मीक समाधान प्राप्त झाले.
लोकन्यायालयात जे निर्णय झाले त्याच्यावर अपील, रिव्हीजन यामधील श्रम खर्च टाळला गेला. न्यायालयाची पायरी न चढताच मैत्रीपूर्ण वातावरणात झालेल्या निर्णयामुळे विधी सेवा प्राधिकरणातर्फे राबविण्यात आलेला उपक्रम म्हणजे वाद थेट लोकन्यायालयात याला यशस्वी प्रतिसाद मिळत आहे. त्याच्यामधून भारतीय राज्यघटनेला अपेक्षित सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय सहज साधता येणे शक्य आहे.
लोकअदालत संदर्भात प्रकरणांची सविस्तर माहिती –
न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे २,९९० एवढी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ४२३ प्रकरणांमध्ये निवाडा झाला. रक्कम रुपये २,१०,३७,४६९/- (रक्कम रुपये दोन कोटी दहा लाख सदतीस हजार चारशे एकोणसत्तर मात्र) एवढया रकमेसंदर्भात वादाचे निवारण झाले. त्याचप्रमाणे १४,८९१ वादपूर्व प्रकरणांपैकी २,८२६ प्रकरणांमध्ये निवाडे झाले. वादपूर्व प्रकरणांमध्ये बॅकांच्या कर्जवसूली प्रकरणात ५,५७,८३,३१०/- (रक्कम रुपये पाच कोटी सत्तावन्न लाख त्र्याऐंशी हजार तीनशे दहा मात्र) एवढी कर्ज प्रकरणे न्यायालयात वाद दाखल करण्यापूर्वीच वसूली झाली. महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण, ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि इतर प्रकरणांमध्ये रक्कम रुपये ८७,१६,३८१/- (रक्कम रुपये सत्त्याऐंशी लाख सोळा हजार चारशे तीनशे एक्याऐंशी मात्र) एवढया रकमेचे वाद सामोपचाराने मिटले.