खरवते ता.लांजा येथील आरोग्य उपकेंद्राचे भूमीपूजन संपन्न

युवा नेते अजित यशवंतराव यांच्या पाठपुराव्याला यश

 

 

लांजा :नसिर मुजावर

दि.१३: तालुक्यातील खरवते येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस तथा लांजा राजापूर विधानसभा क्षेत्राचे स्थानिक युवा नेतृत्व अजित यशवंतराव यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या आरोग्य उपकेंद्राचे आज त्यांचे हस्ते भूमीपूजन करण्यात आले.

तालुक्यातील खरवते हे अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखले जाते. त्याठिकाणी रस्ते, पाणी, आरोग्य अशा मुलभूत विविध अडचणींना ग्रामस्थांना सामोरे जावे लागते. येथील सरपंच दिनेश चौगुले यांनी ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या अडचणीबाबत काही महिन्यांपूर्वी अजित यशवंतराव यांच्यासोबत चर्चा केली होती. त्या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद त्यावेळी अजित यशवंतराव यांच्याकडून मिळाला होता तसेच लवकरच हे प्रश्न मार्गी लावले जातील असा विश्वास त्यांनी सरपंच दिनेश चौगुले यांना दिला होता. त्या संबंधित आरोग्याला प्रथम प्राधान्य देत त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांची काही महिन्यांपूर्वी भेट घेतली होती. आरोग्य मंत्रीनी तात्काळ आरोग्य उपकेंद्राचा विषयाचा सतत पाठपुरावा करुन त्यांनी खरवते येथे आरोग्य उपकेंद्रासाठी ३० लाख रुपये निधी मंजूर करुन घेतला होता.

त्याचपार्श्वभूमीवर अजित यशवंतराव यांच्या सततच्या पाठपुरावा करुन मंजूर केलेल्या आरोग्य उपकेंद्राचा आज भूमीपूजन सोहळा पार पडला. यासाठी गावातील ग्रामस्थ कै. दादू गोपाळ पळसमकर व कै. बयाबाई दादू पळसमकर यांच्या स्मरणार्थ कै.दत्ताराम चौगुले यांच्या इच्छेनुसार श्रीमती.चंद्रभागा दत्ताराम चौगुले व द्रोपदी महादेव मांडवकर यांनी सामाजिक दातुर्त्व म्हणून ५ गुंठे जागा आरोग्य केंद्रासाठी विनामोबदला दिली आहे.

यावेळी अजित यशवंतराव बोलताना म्हणाले की ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न महत्वाचा असल्याने दुर्गम भागात आरोग्य केंद्र असले पाहिजे. तसेच खरवते मधील विकासकामासाठी मी कटीबद्ध असून प्रलंबित असणारी ग्रामपंचायत इमारत, अंगणवाडी व पाण्याचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली. अजित यशवंतराव यांच्या मध्यमातून मंजूर झालेल्या आरोग्य उपकेंद्रामुळे ग्रामस्थांनमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

यावेळी भूमीपूजन सोहळा पार पडताना अजित यशवंतराव यांच्यासोबत जि.प.सदस्य आबा आडीवरेकर, पंचायत समिती सदस्य प्रतिक मटकर, अभिजीत राजेशिर्के, सरपंच दिनेश चौगुले, ओणीचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निलेश खातू, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष मनिष लिंगायत, ओणी विभाग अध्यक्ष दयानंद चौगुले, ग्रामपंचायत सदस्य सौ.सानिका गुरव, दिलीप चौगुले, विनीता पळसमकर, गावकर विजय गुरव, श्रीधर चौगुले, सुरेश चौगुले, ओणी आरोग्य केंद्राचे श्री.मोहिते, बल्हाळ तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.