इचलकरंजी : ‘बिल्डर्स डे’ निमित्त बांधकाम क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव

इचलकरंजी: एजाज  मुजावर 

दि.१२: – बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजी सेंटरचे कार्य कौतुकास्पद असून, देशातील बावीस आणि महाराष्ट्रातील सात स्वमालकीच्या कार्यालयांमध्ये इचलकरंजी सेंटरचाही समावेश असल्याचा अभिमान आहे, असे प्रतिपादन बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बी.ए.आय.) चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव यांनी केले.बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर व ‘आदी स्टील यार्ड’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बिल्डर्स डे’ निमित्त बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून जगन्नाथ जाधव उपस्थित होते, तर माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील अध्यक्षस्थानी होते.

कार्यक्रमात उत्कृष्ट बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर पुरस्कार प्रल्हाद माने यांना देण्यात आला. तसेच गुणवंत कामगार पुरस्कार चंपालाल मालविया (फरशी फिटिंग), जगदीश जांगिड (सुतार), धनंजय कुलकर्णी (आतील पेंटिंग), सतीश माने (बाहेरील पेंटिंग), निखिल महाजन (प्लंबर), संजय माने (फॅब्रिकेशन), चंद्रकांत सस्ते (गिलावा) आणि जगदीश हिरेमठ (सेंट्रिंग) यांना प्रदान करण्यात आले. आदी स्टील यार्डचे अरुण चौगुले यांचा विशेष सत्कार झाला.

अविनाश पाटील म्हणाले, “मोठा बिल्डर होण्यासाठी अनेक घटकांची साथ आवश्यक असते. त्या सर्व घटकांचा सन्मान करून असोसिएशनने बांधकाम क्षेत्रातील प्रेरणादायी परंपरा जपली आहे.”

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन कुंतीलालजी पाटणी, कुतुब गैबान आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. अध्यक्ष फैय्याज गैबान आणि शितल काजवे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. नितीन धूत यांनी प्रास्ताविक करत असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेतला आणि इचलकरंजी सेंटरला मिळालेल्या *‘बेस्ट इमेज बिल्डिंग अवॉर्ड’*चा उल्लेख केला. प्रताप साळुंखे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याध्यक्ष जगन्नाथ जाधव यांच्या हस्ते निर्देशिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच २० नवीन सदस्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रमेश मर्दा यांनी आभार मानले, तर मयूर शहा व राजेंद्र शिंत्रे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.

लायन्स ब्लड बँक प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास बांधकाम क्षेत्रातील व विविध संस्थांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप पटेल, तानाजी हराळे, पुंडलिक जाधव, भगवान कांबुरे, सुहास अकिवटे, संजय रुग्गे, मोहन सातपुते, पन्नालाल डाळ्या, शिवकुमार हिराणी, विकास चंगेडीया, सुधीर लाटकर, राजेंद्र खंडेराजुरी, श्रीकांत लासकर, महेश महाजन, महांतेश कोकळकी, शिवाजी पवार, स्वप्निल शहा आदींनी परिश्रम घेतले.