इचलकरंजी :विजय मकोटे
दि.९ : परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने इचलकरंजी येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटतर्फे तिमोर-लेस्ते येथे एमबीबीएस शिक्षणाच्या उपलब्ध संधींबाबत विशेष मार्गदर्शन सत्र व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारतातील तिमोर-लेस्तेचे राजदूत महामहिम कार्लिटो नुन्स प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी राजदूत कार्लिटो नुन्स यांनी विद्यार्थी व पालकांना तिमोर-लेस्ते येथे वैद्यकीय शिक्षणाच्या उपलब्ध संधींबाबत सविस्तर माहिती दिली. परदेशात एमबीबीएस शिक्षण घेताना शैक्षणिक दर्जा, अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा, राहण्याची व्यवस्था तसेच पुढील वैद्यकीय व्यवसायाच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांनी योग्य माहिती घेऊन निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेपूर्वी विद्यार्थी व पालकांसाठी व्यापक मार्गदर्शनपर सेमिनार घेण्यात आला. या सत्रात परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या विविध संधींबरोबरच तिमोर-लेस्ते येथील वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावर्षीपासून श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटने विद्यार्थ्यांना तिमोर-लेस्ते येथे एमबीबीएस शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींनी तिमोर-लेस्तेला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील वैद्यकीय शिक्षण व्यवस्था, महाविद्यालय, अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधांची पाहणी केली. भारताच्या प्रमुख वैद्यकीय संस्थांमध्ये राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाशी सुसंगत शैक्षणिक आराखडा, एनएमसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अभ्यासक्रम, भारतीय विद्यार्थ्यांसाठी अनुकूल वातावरण, भारतीय प्राध्यापक, भारतीय पाठ्यपुस्तके, भारतीय पद्धतीचे भोजन, वसतिगृह, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि अध्यापन रुग्णालय आदी सुविधांची पाहणी करण्यात आली.
संस्थेच्या प्रतिनिधींनी तिमोर-लेस्ते येथे शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशीही प्रत्यक्ष संवाद साधून तेथील शैक्षणिक तसेच निवासी अनुभवाची माहिती घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांना तिमोर-लेस्ते येथे शिक्षण घेताना कोणत्या सुविधा उपलब्ध होतात, याची प्रत्यक्ष माहिती मिळविण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
तिमोर-लेस्ते येथील एमबीबीएस अभ्यासक्रमाबाबत भारतीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या नियामक बाबींवरही यावेळी माहिती देण्यात आली. संस्थेच्या माहितीनुसार, तेथील अभ्यासक्रम राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC) मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत आहे. तसेच इतर काही देशांप्रमाणे स्थानिक भाषेची स्वतंत्र परवाना परीक्षा उत्तीर्ण करण्याची आवश्यकता नसल्याचा दावा संस्थेने केला आहे. भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी परदेशातून एमबीबीएस पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना त्या वेळच्या एनएमसीच्या लागू नियमांनुसार आवश्यक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.
दरम्यान, शैक्षणिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने श्रद्धा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष ए. आर. तांबे यांनी तिमोर-लेस्तेला भेट देऊन तेथील उपपंतप्रधान महामहिम मारियानो अस्सानामी साबिनो, शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकास विषयातील आंतरराष्ट्रीय सल्लागार डॉ. राजा थंगप्पन तसेच यूसीटीच्या शैक्षणिक संचालक कांचना यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
या उच्चस्तरीय चर्चेमुळे भारत आणि तिमोर-लेस्ते यांच्यातील शैक्षणिक सहकार्याला चालना मिळण्यास मदत होणार असून, भारतीय विद्यार्थ्यांसाठी जागतिक स्तरावर वैद्यकीय शिक्षणाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटच्या वतीने सांगण्यात आले.