इचलकरंजी: विजय मकोटे
दि. २६ : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी इचलकरंजी महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहापूर खणीत गणेशमूर्तींचे विसर्जन केले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहापूर खणीत १५४ सार्वजनिक व २४५ घरगुती अशा एकूण ३९९ गणेशमूर्तींचे, तर नदीघाट येथील कृत्रिम विसर्जन कुंडात ३३ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. अशा प्रकारे शुक्रवारी एकूण ४३२ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या आवाहनानुसार सार्वजनिक मंडळांनी शहापूर खणीत विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. याबद्दल आयुक्त पाटील यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांचे मनःपूर्वक आभार मानले. शहापूर हायस्कूलमागील विसर्जनस्थळ, ओपन जिमजवळील विसर्जनस्थळ आणि बालाजीनगर येथील पद्मा पॅलेससमोरील विसर्जनस्थळी क्रेनसह आवश्यक यंत्रणा उपलब्ध करण्यात आली होती.
महानगरपालिका प्रशासन, गणेशोत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या समन्वयातून विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडली. विसर्जन व्यवस्थेसाठी महानगरपालिकेचे सुमारे २५० अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. यामध्ये उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्ढेकर, विद्या कदम, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, शहर अभियंता बाजीराव कांबळे, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विसर्जनस्थळी सुरक्षिततेसाठी तीन यांत्रिक बोटी, तीन क्रेन, एक अग्निशमन वाहन आणि चार रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. आपत्ती व्यवस्थापन पथकासह पोलीस बॉईज असोसिएशन, आधार रेस्क्यू फाउंडेशन, वीर रेस्क्यू फोर्स, स्काय रेस्क्यू अँड पोलाईट फोर्स, वरद विनायक बोट क्लब तसेच स्थानिक पोहणाऱ्या स्वयंसेवकांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.
संपूर्ण व्यवस्थेवर आयुक्त पल्लवी पाटील आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांचे सातत्याने नियंत्रण होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांसह पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्था, रुग्णवाहिका सेवा देणाऱ्या संस्था, महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांचे आयुक्त पाटील यांनी आभार मानले.