कडवई–साडवलीतील पराभव संशयास्पद; महायुतीच्या वरिष्ठांनी तातडीने चौकशी करावी :भाजप नेते सुर्यकांत साळुंके

संगमेश्वर: सचिन पाटोळे

दि.१२: २०२६ च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात महायुती अस्तित्वात असतानाही चिपळूण–संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील कडवई व साडवली जिल्हा परिषद मतदारसंघात अधिकृत उमेदवारांचा झालेला पराभव धक्कादायक व संशयास्पद असल्याचा आरोप भाजप नेते सुर्यकांत साळुंके यांनी केला आहे.
महायुतीमध्ये शिवसेना (शिंदे गट), भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची युती असतानाही स्थानिक पातळीवर अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. काही प्रभावशाली नेते व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे अधिकृत उमेदवारांना आवश्यक पाठबळ मिळाले नसल्याचा संशय कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत असल्याचेही साळुंके यांनी स्पष्ट केले.
“महायुतीच्या नावाखाली मतदारांची दिशाभूल झाली का? अंतर्गत राजकारणातून अधिकृत उमेदवारांना जाणीवपूर्वक कमजोर करण्यात आले का?” असे थेट प्रश्न उपस्थित करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. कडवई व साडवलीतील पराभव हा केवळ योगायोग नसून संघटनात्मक पातळीवर काही गंभीर घडामोडी झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाने तातडीने हस्तक्षेप करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी व जबाबदारी निश्चित करावी, अन्यथा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, संबंधित नेत्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. या निकालामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून महायुतीच्या अंतर्गत एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या संदर्भात भाजप नेते सुर्यकांत साळुंके लवकरच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन संपूर्ण घडामोडींची माहिती देत उच्चस्तरीय चौकशीची औपचारिक मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.