कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे कार्य राज्यासाठी अनुकरणीय; साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांचे गौरवोद्गार

हुपरी :सलीम मुल्ला 

दि.२७  जुलै २०२६ : महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सोमवारी सपत्नीक कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट देऊन कारखान्याच्या ऊस विकास योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित शेती, स्वयंचलित ठिबक सिंचन तसेच शेतकरी कल्याणाच्या विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी कारखान्याचे कार्य राज्यातील इतर साखर कारखान्यांसाठी अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

          भेटीदरम्यान डॉ. कोलते यांनी कारखान्याच्या ऊस विकास योजनेअंतर्गत कसबा सांगाव येथील सभासद शेतकरी सुरेश नाभिराज मगदूम यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर तळंदगे येथील कारखाना पुरस्कृत जवाहर सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या १०० टक्के क्षेत्रावरील स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेची माहिती घेत समाधान व्यक्त केले. यावेळी कोल्हापूर विभागाच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) उज्ज्वला पळसकर उपस्थित होत्या.

          यानंतर त्यांनी कारखान्याला भेट देऊन स्थापनेपासूनच्या वाटचालीची माहिती घेतली. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांनी ऊस विकास योजना, सहवीज निर्मिती, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, सभासद शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना तसेच कारखान्याच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

             यावेळी बोलताना डॉ. कोलते म्हणाले, संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने सामाजिक व आर्थिक बांधिलकी जपत सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने कार्य केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस शेती आणि सहकारी पद्धतीने राबविण्यात आलेली ठिबक सिंचन योजना ही राज्यातील इतर साखर कारखान्यांसाठी प्रेरणादायी आहे. जवाहर कारखान्याप्रमाणे अशा योजना राज्यभर राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

             कारखान्याने आजपर्यंत शासन, शेतकरी, कामगार किंवा वित्तीय संस्थांची कोणतीही थकबाकी ठेवलेली नाही, ही बाब अत्यंत उल्लेखनीय असून, ती कारखान्याचे सभासद, संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेची पोहोचपावती असल्याचेही त्यांनी नमूद केले.          मागील गाळप हंगामात ऊसटंचाईमुळे राज्यातील अनेक कारखाने मार्चअखेरीस बंद झाले. अशा परिस्थितीत ऊस विकास योजनांद्वारे एकरी ऊस उत्पादन वाढविणे ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी टिश्यू कल्चर रोपे आणि सुधारित ऊस बियाण्यांचा वापर वाढविण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. तसेच कारखान्याच्या विविध समस्यांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

           यावेळी कारखान्याचे व्हाइस चेअरमन, संचालक मंडळाचे सदस्य, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, तळंदगे येथील जवाहर पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन, संचालक तसेच कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते. डॉ. कोलते यांनी कारखान्याच्या एकूण कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातही शेतकरी हिताच्या उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले.