रोहित पवारांनी केलेले दावे धक्कादायक: हेमंत पाटील

‘दादां’च्या अपघातातील सत्य बाहेर यावे; चौकशीचा पुनःरोच्चार

पुणे: प्रतिनिधी
दि.१३:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी केलेले दावे अत्यंत धक्कादायक असून संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि स्वतंत्र निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी शुक्रवारी (ता.१३) केली.याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.दादांच्या अपघातानंतर सर्वात अगोदर २८ जानेवारी रोजीच पुणे पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवून पाटील यांनी चौकशीची मागणी केली होती, हे विशेष.
रोहित यांनी पत्रकार परिषदेत काही छायाचित्रे सादर करत अपघाताशी संबंधित तांत्रिक बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “हा अपघात नसून १००% घात असू शकतो,” असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. ‘दादा’ कारने पुण्याला जाणार होते, मग अचानक विमानाने का गेले? पायलट शेवटच्या क्षणी का बदलला? उड्डाणापूर्वी नेमके काय घडले? या घटनेत कुणाचा सहभाग असू शकतो का? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. पवार कुटुंबियांकडूनच झालेल्या या आरोपांनंतर नागरिकांमध्ये संशय आणखी बळावला आहे. या शंकांचे निराकरण होणे त्यामुळे अत्यंत गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले.अपघातानंतर दादांच्या मृतदेहावर असामान्य सूज दिसून आल्याचा दावा करत त्यामागील कारणांची वैद्यकीय चौकशीची रोहित पवार यांची मागणी योग्य असल्याचे पाटील म्हणाले. रोहित यांच्या आरोपांमुळे मात्र राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून सत्य बाहेर येईपर्यंत जनतेच्या मनातील संशय दूर होणार नाही, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.