RAIDS App चा कमाल! अवघ्या २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख

नागपूर : रजत डेकाटे 

दि.३ :  रत्नागिरी पोलीसांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक RAIDS App च्या मदतीने नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले असून, अवघ्या दोन तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले आहे.नागपूर येथील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जंगल परिसरात एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. मृत व्यक्तीची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत असताना नागपूर पोलिसांनी रत्नागिरी पोलीसांशी समन्वय साधला.रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या दूरदृष्टीतून विकसित करण्यात आलेल्या RAIDS App चा वापर करत मृत व्यक्तीच्या चेहऱ्याचे डिजिटल पुनर्निर्माण (फोटो रीकन्स्ट्रक्शन) करण्यात आले. या तांत्रिक प्रक्रियेच्या सहाय्याने केवळ दोन तासांत मृताची ओळख पटविण्यात आली.

तपासाअंती मृत व्यक्ती ही नागपूर येथील दौलामेटी, आठवा मैल परिसरातील असल्याचे स्पष्ट झाले. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि पोलिसांमधील समन्वय यामुळे तपास प्रक्रियेला मोठी गती मिळत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.