इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि.३ : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय प्रगती करत एकूण व्यवसाय ४८६९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचवला आहे. यामध्ये २९७५ कोटी रुपयांच्या ठेवी आणि १८९४ कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे. बँकेचे भागभांडवल ८१ कोटी रुपयांवर पोहोचले असून आर्थिक तरतूदीपूर्वीचा नफा ५०.२५ कोटी रुपये इतका झाला आहे. बँकेचे निव्वळ एनपीए प्रमाण १.९१ टक्के इतके नियंत्रणात राहिल्याची माहिती चेअरमन स्वप्निल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माजी खासदार व संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे तसेच आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनामुळे बँक सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील बँकिंग क्षेत्रात व्याजदरातील तीव्र स्पर्धा, नैसर्गिक आपत्ती, जागतिक पातळीवरील भूराजकीय अस्थिरता यामुळे उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्रावर मंदीचे सावट होते. तसेच रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी केल्यामुळे कर्जावरील व्याजदर कमी झाले; मात्र ठेवींवरील व्याजदर त्यानुसार कमी न झाल्याने सर्वच बँकांच्या नफ्यावर परिणाम झाल्याचे आवाडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बँकेने कर्नाटक राज्यातील चिक्कोडी येथे नवीन शाखा सुरू केली असून गुजरात राज्यात विस्तारासाठी रिझर्व्ह बँकेकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अहमदाबाद व सुरत येथे लवकरच दोन नवीन शाखा सुरू करण्याचा मानस आहे. तसेच ग्राहकांना इंटरनेट बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही मंजुरी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला व्हाइस चेअरमन सीए संजयकुमार अनिगोळ, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सीए चंद्रकांत चौगुले, महेश सातपुते, बंडोपंत लाड, रमेश पाटील, शैलेश कित्तूरे, बाळकृष्ण पोवळे, द्वारकाधीश सारडा, शैलेश गोरे, सुभाष जाधव, बाबूराव पाटील, तात्यासो अथणै, अविनाश कांबळे, अॅड. सारंग जोशी, तसेच सदस्य राजू चव्हाण, योगेश पाटील, सुचिन देवरुखकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे, जनरल मॅनेजर किरण पाटील, दिपक पाटील यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.