सांगली: अय्यान पटेल
दि.१४: राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026” अंतर्गत सांगली पाटबंधारे मंडळच्या वतीने दिनांक १५ ते ३० एप्रिल या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या पंधरवड्यात सर्व संबंधित विभाग, शेतकरी, पाणी वापर संस्था व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून जलसंवर्धनाच्या या अभियानास यशस्वी करावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
वारणाली वसाहत येथे दिनांक 15 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्या हस्ते पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जलसंपत्तीचा कार्यक्षम वापर, जलसंवर्धन, पाण्याचे पुनर्भरण, शाश्वत सिंचन पद्धती आणि जनजागृती यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यामध्ये जलसंपदा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, Rain Water Harvesting विषयी जनजागृती, शेतकरी व पाणी वापर संस्थांशी संवाद, कालवे व धरण परिसर स्वच्छता अभियान, नदी प्रदूषण नियंत्रण, तसेच पाणी वापराशी संबंधित तक्रार निवारण आदि उपक्रमांचा समावेश आहे.
तसेच, कृषि व जलसंपदा विभागाच्या संयुक्त विद्यमाने पीक पद्धती, उत्पादन वाढ व पाणी नियोजन याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम, कार्यशाळा व प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहेत. महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत स्तरावर प्रत्यक्ष पाणी वापराचे जललेखा परीक्षण करण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन (पूर/मालमत्ता संरक्षण) यासंदर्भातही मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या समन्वयाने जमीन विषयक (७/१२ उतारा दुरुस्ती, अतिक्रमण हटविणे) बाबींवर कार्यवाही करण्यात येणार असून, पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी चर्चासत्र व कार्यशाळा आयोजित करण्यात येतील.
दिनांक ३० एप्रिल रोजी, उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यशाळा/महिला मेळावा आयोजित करून या पंधरवड्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी/अभियंत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.