वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय प्रगती अशक्य – संदीप गोवळकर”

ठाणे: प्रतिनिधी

दि.१५: आपण विज्ञानाने निर्माण केलेल्या आधुनिक साधनांचा वापर करतो; पण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यास मात्र टाळाटाळ करतो. हाच विरोधाभास अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहे. अंधश्रद्धेच्या विळख्यातून समाजाला मुक्त करायचे असेल, तर विज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिप्रादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संदीप गोवळकर यांनी केले.

       क्राऊड बुद्धिस्ट कम्युनिटी, लोढा माजिवडा,ठाणे यांच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष जयवंत गायकावड, उपाध्यक्ष प्रतीक पवार,सुभाष आचालखांब,सचिव निलेश गरुड,सह सचिव प्रवीण धुतराज,खजिनदार दीपक जाधव, सह खजिनदार निलेश निरभवणे,सल्लागार रवींद्र जाधव,महेंद्र नाकते,सदस्य सुनील माने,भत्ते लघु पवार,सोसायटी नागरिक उपस्थित होते.यावेळी उपस्थिातांना मार्गदर्शन करताना अंनिसचे श्री. गोवळकर म्‍हणाले की, भारतीय राज्यघटनेतील कलम ५१ नुसार प्रत्येक नागरिकाला वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती जोपासण्याची जबाबदारी देते. पण प्रत्यक्षात समाजात याच्या अगदी उलट चित्र दिसते. अंधश्रद्धा, चमत्कारांचे दावे आणि अवैज्ञानिक समजुती आजही मोठ्या प्रमाणावर टिकून आहेत.“वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कुठल्याही घटनेमागील कारण शोधण्याची वृत्ती. जेवढा पुरावा, तेवढाच विश्वास  ही त्याची भूमिका. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग या मार्गांनीच सत्य समजून घेता येते,”

     कोणी मोठी व्यक्ती सांगते म्हणून ते सत्य मानणे, किंवा एखाद्या ग्रंथात लिहिले आहे म्हणून त्याची चिकित्सा न करणे ही गुलाम मानसिकता आहे.चमत्कार हे वास्तव नसतात; ते हातचलाखी किंवा अज्ञानाचा फायदा घेणारी फसवणूक असते. प्रत्येक घटनेमागे कारण असतेच. ‘चमत्कार’ हा शब्दच माणसाला विचार करणे थांबवायला भाग पाडतो.मानवाची आजवरची सर्व प्रगती ही विज्ञानामुळेच झाली आहे. विज्ञान नम्र आहे, बदल स्वीकारते आणि स्वतःची चूकही मान्य करते. पण धर्म अंतिम सत्याचा दावा करतो  हीच मोठी समस्या आहे.”यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मंडळाचे अध्यक्ष श्री.गायकवाड साहेब म्हणाले की, बाबासाहेबांनी बालपणापासूनच अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत शिक्षणाच्या जोरावर स्वतःला घडवले. जातीय भेदभाव, सामाजिक अन्याय आणि उपेक्षा यांना न जुमानता त्यांनी ज्ञान, परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर इतिहास घडवला.बाबासाहेबांचा संघर्ष हा केवळ वैयक्तिक नव्हता, तर तो संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी होता. त्यांनी समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या या संघर्षातून आजच्या पिढीने प्रेरणा घेऊन अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व अभार प्रदर्शन प्रतीक पवार यांनी केले.