पुणे: प्रतिनिधी
दि.१६:पुणे आणि महाराष्ट्रासाठी आजचा दिवस भाग्याचा असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळते आहे. यापुढेही नव्या रुग्णालय प्रकल्पामुळे हजारो लोकांना जीवनदान लाभणार आहे आणि अनेक कुटुंबांचे दु:ख दूर होईल, तसेच रुग्णांची जीवन जगण्याची आशा पल्लवीत होईल. मंगेशकर कुटुंबाने गाण्यापलिकडे जाऊन राष्ट्रभक्तीच्या भावनेने सेवा कार्य केले आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या रुग्णांना माणुसकीची ऊब मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रुग्णालयात संगीतोपचाराची सुविधा निर्माण करून त्यांना लतादिदी आणि आशा भोसले यांचा स्वर ईश्वराने दिलेले आशिर्वाद असल्याने त्यांची गीते ऐकवावीत, अशी सूचना शिंदे यांनी केली. मंगेशकर कुटुंबाच्या या सेवाकार्यास शासनाकडून सहकार्य मिळेल. लतादीदी आणि आशाताई आपल्यात नसल्या तरी त्या या रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांसाठी सूरसंजीवनी बनून राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आपले आणि पुढील पिढीचे संगीतविश्व लतादिदी आणि आशाताईंच्या स्वराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आशाताई मराठी अस्मितेचा मानबिंदू होत्या, त्या स्वरांची आकाशगंगा होत्या. आशा नावाच्या स्वरगंगेत सर्व मानवी भावभावना सामावल्या होत्या. आशाताईंना समाजाच्या दु:ख आणि वेदनांची जाणिव होती. त्यांना जीवनात मोठा संघर्ष करावा लागला. त्यांनी जीवनाचे रडगाणे न करता आनंदगाणे केले. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचा दिवस जीवनातील सर्वात भाग्याचा दिवस असल्याचे ते म्हणाले.
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, आपलेपणा असला तर सेवा आपोआप घडते. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी अखंड स्वरसेवा केली. म्हणून त्यांचे स्वर मानवी वेदना दूर करणारे आहेत. लता-आशा रुग्णालय प्रकल्पाची सुरूवात दोन्ही गायिकांच्या कार्याला दिलेली श्रद्धांजली आहे. माणसासाठी जीवनावश्यक बाबीत शिक्षण आणि आरोग्य महत्वाचे आहे. या दोन्ही गोष्टी सर्वांना परवडणाऱ्या आणि सुलभ असण्याची गरज आहे. सर्व प्रकारची चिकित्सा एकाच ठिकाणी उपलब्ध झाली तर रुग्णावर होणारा खर्च कमी होतो. मंगेशकर कुटुंबीयांच्या सेवेच्या दृष्टीकोनानुसार ही योजना नव्या रुग्णालय प्रकल्पात करण्यात आली आहे.
आज समाजात अनेक लोक काही अपेक्षा न करता निष्काम सेवा करीत आहेत. त्यामुळे आपलेपणा टिकून रहातो. नि:स्वार्थ सेवा आणि बंधूभाव यामुळे समाज जुळलेला रहातो आणि चांगुलपणावर विश्वास ठेवून वागतो. त्यामुळे असे सेवा प्रकल्प सुरू रहाणे गरजेचे असून त्यात प्रत्येकाने या मानवतेच्या कामात आपला वाटा उचलला पाहिजे. सर्वांनी प्रयत्न केल्यास समाजातील दू:ख दूर होतील, असा विश्वास भागवत यांनी व्यक्त केला.मिलिंद कुलकर्णी यांनी पं.हृदयनाथ मंगेशकर यांचे मनोगत सादर केले. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्मृती जतन करताना रुग्णालयाच्या माध्यमातून गरीब रुग्णांची सेवा होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आशाताईंचे पूत्र आनंद भोसले यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविकात लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ.धनंजय केळकर यांनी रुग्णालय प्रकल्पाची माहिती दिली. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ४० एकर क्षेत्रात हा रुग्णालय प्रकल्प उभारण्यात येत असून तो देशातील मोठा रुग्णालय प्रकल्प असावा असा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, सुनिल कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, बापू पठारे, हेमंत रासने तसेच आदीनाथ मंगेशकर यांच्यासह मंगेशकर आणि भोसले कुटुंबीय उपस्थित होते.