प्रत्येक योग्य लाभार्थ्यापर्यंत अन्न सुरक्षा योजनेचा लाभ पोहोचण्याची दक्षता घेण्याच्या राज्य अन्न आयोगाच्या सूचना  

 आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे, सदस्य रणजीत निंबाळकर जिल्हा दौऱ्यावर- विविध विभागांचा घेतला आढावा

 सांगली: अय्यान पटेल

दि.१७: प्रत्येक योग्य पात्र लाभार्थ्यापर्यंत अन्न सुरक्षा योजनेचा लाभ पोहचेल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिल्या. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 च्या अंमलबजावणीवर संनियंत्रण आणि पुनर्विलोकन करण्याच्या अनुषंगाने राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे व सदस्य रणजीत निंबाळकर यांनी संबंधित विभागांशी घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.

     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेतलेल्या या आढावा बैठकीसाठी अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी सांगली जिल्ह्यातील जिल्हा तक्रार निवारण अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व प्रकल्प अधिकारी आदि अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन विविध बाबींचा आढावा घेतला. यावेळी राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे व सदस्य रणजीत निंबाळकर यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्था, माध्यान्ह भोजन योजना, एकात्मिक बाल विकास सेवा अशा अन्न योजनांशी संबंधित आढावा घेतला. तसेच ३-६ वयोगटातील बालके, स्तनदा माता, गरोदर महिला यांच्याशी संबंधित योजनांची चर्चा झाली. जिल्हा बाल रोग तज्ज्ञ व महानगरपालिका बाल रोग तज्ज्ञ यांच्या समवेत कुपोषित (SAM व MAM) बालकांबाबत आढावा घेऊन सुधारणा सूचविल्या. जिल्ह्यातील तृतीयपंथी संघटना, भीकमुक्ती संदर्भीय काम करणाऱ्या संघटना, वेश्याव्यावसायिक यांच्याशी संलग्न संघटना यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व प्रत्येक योग्य लाभार्थ्यांपर्यंत अन्न सुरक्षा योजनेचा लाभ पोहचेल याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान दि. १८ एप्रिल रोजी शासकीय धान्य गोदाम, शालेय पोषण आहार पुरवठादार गोदामे, महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी तसेच केंद्रीय स्वयंपाकगृह, शाळा, अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकानांना भेटी असा क्षेत्रीय भेटीचा कार्यक्रम आहे.