इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.२७: सध्या असलेल्या सीईटीपी प्रकल्पाचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. आजही या प्रकल्पातून प्रक्रिया करुनच पाणी बाहेर सोडले जाते. याचठिकाणी आता अत्याधुनिक झेडएलडी प्रकल्प उभारण्यात येणार असून तो पूर्ण होण्यास १५ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे प्रदुषण प्रश्नाचे राजकारण न करता हा प्रकल्प पूर्णत्वासाठी अवधी द्यावा, त्यानंतर प्रदुषणाचा प्रश्न निर्माण होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जाईल, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटना (इंटक) च्या वतीने प्रांताधिकारी यांना देण्यात आले.
दोन महिन्यांपासून पंचगंगा प्रदुषणावरुन आंदोलने छेडली जात आहेत. त्यातूनच उद्योग, व्यवसाय बंद पडण्याची भिती व्यक्त होत असून इचलकरंजीतील व्यवसायाची साखळी विस्कळीत होऊ नये यासाठी सोमवारी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात, इचलकरंजीसह परिसरातील गावांनी अनेक वर्षे प्रदूषणाचा त्रास सहन केला आहे. तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांच्या दूरदृष्टीतून शहरात सामुहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आणि बर्याच प्रमाणात प्रदुषणाचा प्रश्न मार्गी लागला. आता आमदार आणि खासदार यांच्या सहकार्यातून प्रोसेसधारकांनी एकत्र येऊन प्रकल्पाचे आधुनिकीकरण सुरु केले आहे. त्यासाठी शासनाने साडेतीन कोटीचे अनुदान दिले असून हा अत्याधुनिक झेडएलडी प्रकल्प पूर्णत्वासाठी १५ महिन्यांचा कालवधी लागणार आहे. परंतु याच सकारात्मक घडामोडींचा राजकिय स्वार्थासाठी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न कांही लोकांकडून होताना दिसतो. पंचगंगा प्रदूषणासाठी अनेक घटक जबाबदार असताना केवळ इचलकरंजीतील प्रोसेस व्यावसायिकांनाच लक्ष्य केले जात आहे. हा व्यवसाय बंद पडल्यास ७ ते ८ हजार कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे इतकी वर्षे थांबलोच असून आणखीन १५ महिन्यांची मुदत द्यावी, व्यवसायच बंद पडले तर प्रकल्प कसा पूर्ण होईल? त्यामुळे सीईटीपी प्रकल्पाचे आधुनिकीकरण होईपर्यंत व्यवसाय बंद पडणार नाहीत अशी भूमिका घ्यावी. त्यानंतर कोणताही गैरप्रकार होणार नाही यासाठी आम्हीही योगदान देऊ, असे म्हटले आहे.
शिष्टमंडळात उपाध्यक्ष प्रदीप साहू, जॉ.सेक्रेटरी राजेंद्र बचाटे, विठ्ठल वाघरे, दशरथ मोहिते, बापू घुले, श्रीमती मंगल सुर्वे व इंटकचे पदाधिकार्यांचा समावेश होता.