सांगली: अय्यान पटेल
दि.३०: इंडेक्स टेस्टींगव्दारे अधिकाधिक एचआयव्ही तपासणी करून एचआयव्ही संसर्गित रूग्ण आढळल्यास सर्व रूग्ण औषधोपचार आणावेत. औषधांचा कोणताही तुटवडा भासणार नाही याची दक्षता घ्यावी. एकही रूग्ण दुर्लक्षित होऊ नये याची काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शामराव जाधव, महानगरपालिका वैद्यकिय अधिकारी डॉ. वैभव पाटील, वैद्यकिय अधिकारी डॉ. श्रीगणेश पवार, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत, पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, विविध विभागांचे अधिकारी, आरोग्य क्षेत्रातील प्रतिनिधी, या विषयात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, एच आय व्ही संसर्गित स्वावलंबी व्हावेत, त्यांना सक्षम करण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला हव्यात. यासाठी रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकता विकास मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून अशा एडस्बाधितांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण द्यावे. तसेची आरसेटीच्या माध्यमातूनही प्रशिक्षण द्यावे. यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले. आयसीटीसीसाठी ॲम्बुलन्सचा प्रस्ताव सादर करावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. ज्या भागात एचआयव्ही संसर्गित रूग्ण जास्त आढळतात त्या ठिकाणी कॅम्प आयोजित करून तपासणी करावी. त्यांची क्षयरोग तपासणी, आयुष्यमान कार्ड काढणे, एसआयआर संबंधित कामकाजाची कार्यवाही करावी. यासाठी संबंधित तहसिलदार यांना अवगत करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी एचआयव्ही संसर्गित विवाह इच्छुक वधुवरांचा परिचय मेळावा आयोजित करून दोन मेळाव्याच्या माध्यमातून एकूण 16 जोडप्यांचा विवाह झाला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सर्वसाधारण रूग्णांची तपासणी व त्यामध्ये संसर्गितांचे प्रमाण, तालुकानिहाय एच. आय. व्ही. बाधित रूग्णसंख्या, ए. आर. टी. सेंटरमधील उपचार, एच. आय. व्ही – टी. बी. समन्वय, गर्भवती मातांची तपासणी व संसर्गाचे प्रमाण आदिंचा आढावा घेण्यात आला.जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत यांनी एड्स नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येत असलेल्या कामकाजाची सादरीकरणातून माहिती दिली. तसेच मिशन एड्स सुरक्षा अंतर्गत केलेल्या कार्यवाहीची आणि पुढील नियोजनाची सविस्तर माहिती सादर केली.