यंत्रमागधारकांच्या वीज बिल सवलतीसाठीच्या ऑनलाईन नोंदणीस तीन महिन्यांची मुदतवाढ : आ.राहुल आवाडे यांच्या प्रयत्नांना यश

इचलकरंजी: विजय मकोटे

दि.१३:यंत्रमाग उद्योगाची वीज सवलत सुरू ठेवणेसाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणेसाठीची मुदत वाढवावी अशी मागणी इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योग मंत्री मा.संजय सावकारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली होती यास यश येऊन आज वस्त्रोद्योग मंत्रालयाने तीन महिने मुदत वाढीचा शासन निर्णय जारी केला आहे.

वस्त्रोद्योग धोरण २०२३ – २८ अंतर्गत वीज सवलतीचा लाभ मिळण्यासाठी यंत्रमाग घटकांना शासन निर्णय झालेपासून सहा महिन्यांची मुदत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणेसाठी देणेत आली होती. परंतू सदर ऑनलाईन अर्ज भरण्यामध्ये यंत्रमागधारकांना अडचणी येत होत्या व त्यातील जाचक अटी पूर्ण करणे अशक्य होते. त्यामुळे सदरचा फॉर्म सोपा करावा यासाठी वस्त्रोद्योग मंत्री, वस्त्रोद्योग आयुक्त व आमदार राहुल आवाडे यांच्याकडे पॉवरलुम असोसिएशनने पाठपुरावा केला होता. यानंतर आमदार राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योग मंत्री यांच्यासोबत तीन मिटींग घेऊन अर्ज सोपा व सुटसुटीत करणेची मागणी केली. यानुसार वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून दि. ०७ एप्रिल २०२६ रोजी ऑनलाईन सोपा व सुटसुटीत अर्ज करून देणेत आला. शासन निर्णयानुसार ऑनलाईन अर्ज भरणेची मुदत दि. २६ एप्रिल २०२६ पर्यंत होती. सदर वेळेत यंत्रमागधारकांना अर्ज करणे शक्य नसलेने यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने वस्त्रोद्योग मंत्री, वस्त्रोद्योग आयुक्त व आमदार राहुल आवाडे यांच्याकडे विनंती केली होती. यास अनुसरून आमदार राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योग मंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ऑनलाईन अर्ज भरणेस मुदतवाढ मिळणेविषयी विनंती केली होती. त्यास यश येऊन आज वस्त्रोद्योग मंत्रालयाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्याचा शासन आदेश जरी केला आहे. यंत्रमाग उद्योजकांनी तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन नोंदणी करावी अन्यथा शासन निर्णयाप्रमाणे वीज सवलत आपोआप बंद होईल. त्यामुळे यंत्रमाग उद्योजकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करावी असे परिपत्रक दि इचलकरंजी पॉवलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.