इचलकरंजी विभागातील दोन सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई

इचलकरंजी: विजय मकोटे

दि.१६:इचलकरंजी उपविभागातील शहापूर व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांवर कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकाश गोविंद आडके (रा. समर्थनगर, तारदाळ, ता. हातकणंगले) याच्यावर साथीदारांसह खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न करणे, कोविड काळात शासकीय आदेशाचे उल्लंघन करणे तसेच गंभीर दुखापत करण्यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्याला दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरण प्रकाश जगदाळे (रा. जुना चंदूर रोड, परीट गल्ली, इचलकरंजी) याच्यावर मारामारी, दुखापत करणे व चोरीसारखे गुन्हे दाखल असून त्याला एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
सदर दोन्ही गुन्हेगारांच्या विरोधातील गुन्हेगारी पार्श्वभूमीची पडताळणी करून तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर चौकशी अहवालाच्या आधारे उपविभागीय दंडाधिकारी यांनी अंतिम आदेश पारित केले.या कारवाईमुळे शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सदरची कार्यवाही पोलीस कर्मचारी सागर हारगुळे, साजिद कुरणे व पवन गुरव यांनी पूर्ण केली.