इचलकरंजीत विशेष मोहिम; सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन व वाहतूक नियमभंगाविरोधात कारवाई

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी

दि.१६:उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी शहर व परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन, मद्यप्राशन करून वाहन चालविणे तसेच अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे याविरोधात विशेष मोहिम राबविण्यात आली.
दि. १२ मे २०२६ रोजी रात्री ८ ते ११ या वेळेत इचलकरंजी, शिवाजीनगर व शाहापूर पोलीस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली. शहरातील सांगली रोड, मुसळे हायस्कूल परिसर, गंगानगर, पंचगंगा कारखाना परिसर, महसोबा मंदिर परिसर, पंचगंगा नदी रोड, यशोलक्ष्मी मैदान, डेक्कन चौक, अलायन्स हॉस्पिटल परिसर, पाटील मळा कबनूर आदी भागांत पेट्रोलिंग करण्यात आले.
या विशेष मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना आढळलेल्या १९ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या २ जणांवर आणि अल्पवयीन मुलास वाहन चालविण्यास दिल्याप्रकरणी १ गुन्हा दाखल करण्यात आला. अशा एकूण २२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.