कडवई :नियाझ खान
दि.५: संगमेश्वर तालुक्यातील कडवई पाटीलवाडी गावाचे सुपुत्र तथा सध्या नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने नवी मुंबई येथे वास्तव्यास असलेले समाजसेवक सुधीर सुर्वे यांना सिस्मॅक आयटी कंपनीच्या प्रतिष्ठित ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सुधीर सुर्वे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. नोकरीसोबतच व्यवसाय क्षेत्रातही यश मिळवत त्यांनी आर्थिक स्थैर्य प्राप्त केले. मात्र, यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संस्था, गाव व वाडी मंडळांना सहकार्य करण्याबरोबरच अनेक गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या दातृत्वामुळे अनेक गरजू कुटुंबांना आधार मिळाला असून समाजहितासाठी त्यांनी केलेले योगदान उल्लेखनीय ठरले आहे.
त्यांच्या या समाजसेवेची दखल घेत मुंबईस्थित सिस्मॅक आयटी कंपनीने त्यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार जाहीर केला. नुकताच हा पुरस्कार समारंभ पार पडला असून पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील यांच्या हस्ते त्यांना पगडी व सन्मानचिन्ह, शाल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर तसेच महापौर नितीन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.सुधीर सुर्वे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कडवई पंचक्रोशीतील नागरिक, मित्रपरिवार व विविध सामाजिक संस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यातून समाजातील तरुणांना प्रेरणा मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.