इचलकरंजीच्या शाश्वत पाणीपुरवठ्याबाबत लवकरच निर्णय; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

मुंबई: प्रतिनिधी 

दि.१८ : इचलकरंजी शहर व परिसराच्या दीर्घकालीन आणि शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून, पाणी साठवण क्षमता वाढविण्यासह विविध पर्यायांचा अभ्यास करून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती देवेंद्र फडणीस यांनी दिली.इचलकरंजीच्या पाणीपुरवठा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वर्षा निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी खासदार धैर्यशील माने , आमदार डॉ. राहुल आवाडे इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे , उपमहापौर अनिल डाळ्या  जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


बैठकीत इचलकरंजी शहराच्या वाढत्या पाणी गरजा, कृष्णा नदीवरील उपलब्ध जलस्रोत आणि परिसरातील गावांच्या पाणीपुरवठ्याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी खासदार धैर्यशील माने आणि आमदार राहुल आवाडे यांनी शहराच्या भविष्यातील पाणी गरजांबाबत विविध पर्याय मांडले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कृष्णा नदी ही तीन राज्यांसाठी महत्त्वाची जीवनवाहिनी असून कोणत्याही राज्याचे नुकसान न करता संबंधित भागाला आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. इचलकरंजीच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी पाणी साठवण क्षमता वाढविण्याचे विविध पर्याय तपासण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक बाबींचा सखोल अभ्यास पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही दिली. आवश्यक असल्यास बिनव्याजी दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देण्याचाही विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर वसुली अधिक प्रभावी करावी आणि बांधकाम क्षेत्रातील नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.इचलकरंजीच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्री स्तरावर झालेल्या या बैठकीमुळे शहरवासीयांमध्ये आशावाद निर्माण झाला असून, शासनाच्या आगामी निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.