दत्तचे मार्गदर्शन शेतकरी हिताचे — डॉ. निलेश मालेकर

कवठेगुलंद, :प्रतिनिधी 

दि.२ : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कवठेगुलंद येथे आयोजित शेतकरी मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मेळाव्यात ऊस शेती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, मृदा व पाणी व्यवस्थापन तसेच दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले कृषी शास्त्रज्ञ डॉ. निलेश मालेकर यांनी ऊस पिकाच्या शास्त्रोक्त व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती दिली. ऊस लागवडीपासून ते काढणीपर्यंत पाणी व्यवस्थापन, ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर, खत व औषधांचे योग्य नियोजन, पानांचा आकार, विविध रोग व किडींची लक्षणे, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना, बाळभरणीचे महत्त्व, आंतरपिकांची निवड तसेच अधिक उत्पादनासाठी माती, पाणी व पान परीक्षणाचे महत्त्व त्यांनी विशद केले. “शेती हा केवळ पारंपरिक व्यवसाय न मानता शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवसाय म्हणून केल्यास निश्चितच अधिक उत्पादन व चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी पशुसंवर्धन तज्ज्ञ अनिता जाधव यांनी शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसायाचे महत्त्व अधोरेखित केले. जनावरांचे योग्य संगोपन, संतुलित आहार, हिरवा चारा व चारा नियोजन, दूध उत्पादन वाढविण्याच्या पद्धती तसेच शेणखताचा प्रभावी वापर करून जमिनीची सुपीकता वाढविता येते, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. दुग्ध व्यवसायामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत असल्याने प्रत्येक शेतकऱ्याने शेतीसोबत दुग्ध व्यवसायही स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी गणपतराव पाटील यांनी मार्गदर्शन करताना, “शेती टिकविणे ही आजच्या काळाची गरज आहे. काळ्या आईची सेवा करणे हे पुण्याचे कार्य आहे. शेतकरी टिकला तर जग टिकेल. त्यामुळे तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीकडे वळावे आणि शेतीला व्यवसाय म्हणून स्वीकारावे,” असे आवाहन केले.

कारखान्याचे ए. एस. पाटील यांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासद शेतकऱ्यांसाठी मोफत माती, पाणी व पान परीक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती दिली. या सुविधेचा लाभ घेऊन शास्त्रशुद्ध शेती करावी आणि उत्पादनात वाढ साधावी, असे त्यांनी सांगितले.

मेळाव्यास परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेत विविध विषयांवर तज्ज्ञांशी संवाद साधला. आधुनिक शेती, पूरक व्यवसाय आणि शास्त्रशुद्ध नियोजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा संदेश या मेळाव्यातून देण्यात आला.