धरणगुत्ती (ता. शिरोळ), : राम आवळे
दि.२ : जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळामध्ये लिंगायत समाजातील सर्व घटकांचा समावेश करून महामंडळ अधिक सक्षम करण्यात यावे, त्यासाठी किमान एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी तसेच महामंडळातील विद्यमान त्रुटी दूर कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी ९ ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या बेमुदत साखळी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर धरणगुत्ती येथे लिंगायत समाजाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत समाजातील सर्व घटकांनी एकसंघ राहून आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील होते. प्रारंभी शेखर पाटील यांनी स्वागत करून आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.
प्रमुख मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील यांनी महामंडळाच्या स्थापनेपासूनचा प्रवास, उद्दिष्टे आणि सध्याच्या त्रुटींचा सविस्तर आढावा घेतला. महामंडळासाठी किमान एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली. या निधीमुळे शेतकरी, विद्यार्थी, गृहिणी, व्यापारी आणि समाजातील सर्व घटकांना विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.
महामंडळासाठी कायमस्वरूपी आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून समाजाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल आणि शासनस्तरावर प्रश्नांचा पाठपुरावा अधिक वेगाने होईल, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच ‘वीरशैव’ आणि ‘लिंगायत’ असा कोणताही भेद न करता लिंगायत समाजातील सर्व घटकांचा महामंडळात समावेश करण्यात यावा, ही समाजाची प्रमुख अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शासनाच्या धोरणांतील त्रुटींवर भाष्य करत समाजाच्या मागण्या पूर्णपणे न्याय्य असल्याचे सांगितले. या मागण्यांसाठी शासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे त्यांनी आश्वासन दिले.
इचलकरंजी महानगरपालिकेचे नगरसेवक संजय तेलनाडे यांनी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, उद्दिष्टे आणि विद्यमान त्रुटींची माहिती देत महामंडळ अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी केली. ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बेमुदत साखळी उपोषणात समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापूरे यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गट-तट विसरून एकसंघ राहण्याची गरज अधोरेखित केली. संघटित समाजच आपले प्रश्न प्रभावीपणे सोडवू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी राजेंद्र पिंपळे, बी. एस. पाटील, कॉ. आप्पा पाटील, नितीन पाटील, उदय पाटील व सुरेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून समाजाच्या हक्कांसाठी एकदिलाने लढण्याचे आवाहन केले. धनगर समाजाचे नेते अशोक कोळेकर आणि शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी लिंगायत समाजाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला. सरला पाटील यांनी लिंगायत धर्माची वैचारिक परंपरा आणि सामाजिक योगदान याविषयी मार्गदर्शन केले, तर रजनी मगदूम यांनी समाजाच्या मागण्या न्याय्य असून शासनाने त्या तातडीने मान्य कराव्यात, अशी भूमिका मांडली.
या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, नगरसेवक संजय तेलनाडे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापूरे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच दरगू गावडे, पंकज गुरव, दीपक परीट, राजशेखर तंबाखे, स्मिता तेलनाडे, सुनील गोटखिंडे, संतोष जाधव, युनूस डांगे, चंद्रकांत जाधव, गुंडाप्पा पवार, सरदार कारंडे, सुदर्शन कदम, रवींद्र चौगुले, गजानन चौगुले, नितीन बागे, महेश परीट, नीलम म्हेत्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी ९ ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणारे बेमुदत साखळी उपोषण ऐतिहासिक, शिस्तबद्ध आणि अभूतपूर्व करण्याचा एकमुखी निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.