खरीप हंगामातील पीकस्पर्धा जाहीर  

कोल्हापूर: प्रतिनिधी

दि.२४: कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2026 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडिद, सोयाबीन, भुईमूग, सुर्यफुल या 11 पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

पिकस्पर्धेची वैशिष्टे – पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै- मूग व उडिद, 31 ऑगस्ट- भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सुर्यफुल

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र आहे. सर्वसाधारण गटासाठी रक्कम रुपये 300 तर आदिवासी गटासाठी रक्कम रुपये 150 असणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.

पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर (20 गुंठे) व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर (1 एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका स्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरुन राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. 

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे- विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12, 8 अ उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पीकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानांची छायांकित प्रत इत्यादी.अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावर सहायक कृषी अधिकारी / उप कृषी अधिकारी / मंडळ कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी / उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.