इचलकरंजीत सर्वसामान्यांसाठी घरकुल प्रकल्प; पहिल्या टप्प्यात १२०० घरे उभारणार – दीड वर्षात लाभार्थ्यांना घरांचा ताबा देण्याचा प्रयत्न : माजी मंत्री प्रकाश आवाडे

इचलकरंजी:विजय मकोटे 

दि  ५ जुलै २०२६ : शहर व परिसरातील कष्टकरी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे घर मिळावे या उद्देशाने इचलकरंजीत मोठ्या घरकुल प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात एक हजार ते बाराशे घरे बांधली जाणार आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच होणार असून दीड वर्षाच्या आत लाभार्थ्यांना घरांचा ताबा देण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिली.सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त जय सांगली नाका परिसरात साकारण्यात येणाऱ्या घरकुल प्रकल्पाच्या लाभार्थी मेळाव्यात ते बोलत होते.

            प्रकाश आवाडे म्हणाले, वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असलेल्या इचलकरंजीत रोजगारासाठी आलेल्या अनेक कष्टकरी व सर्वसामान्य कुटुंबांकडे स्वतःचे घर नाही. त्यांच्या घराच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी नव्याने स्थापन होणाऱ्या प्रकाश आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

           जय सांगली नाका ते टाकवडे मार्गावर सुमारे १० एकर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १,००० ते १,२०० घरकुले बांधण्यात येणार असून प्रत्येक घर ३२५ चौरस फूट क्षेत्रफळाचे असेल. प्रत्येक घरामध्ये हॉल, किचन, बेडरूम तसेच स्वतंत्र स्नानगृह व शौचालयाची सुविधा असेल. ही घरे बहुमजली इमारतींमध्ये उभारली जाणार आहेत.

              लाभार्थी निवडीसाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या असून अर्जदाराचा सीबील स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्रात कुटुंबाच्या नावावर अन्यत्र घर नसावे. सुरुवातीला एक लाख रुपये भरून क. आवाडे इचलकरंजी जनता बँकेत खाते उघडावे लागेल. त्यानंतर सहा महिन्यांनी आणखी एक लाख रुपये जमा करावे लागतील. उर्वरित आठ लाख रुपयांचे कर्ज ९ टक्के व्याजदराने २० वर्षांच्या मुदतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

             या प्रकल्पासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २ लाख ६७ हजार रुपयांचे अनुदान मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अतिरिक्त दोन लाख रुपयांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार असून, राज्य शासनाकडून सर्व लाभार्थ्यांना एक लाख रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. तसेच महानगरपालिकेनेही स्वतंत्रपणे प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत द्यावी, यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

               सर्वसामान्यांच्या आवाक्यातील सुमारे पाच हजार घरकुले उभारण्याचे उद्दिष्ट असून भविष्यात तारदाळ, कोरोची, चंदूर आभार फाटा परिसरातही अशाच प्रकारचे घरकुल प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश आवाडे यांनी दिली.

यावेळी महापौर उदय धातुंडे, प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, महेश सातपूते, शेखर शहा, सतीश मुळीक, सुशांत कलागते, संजय केंगार, क. आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगांवे, जनरल मॅनेजर किरण पाटील, दीपक पाटील, सपना भिसे, सीमा कमते, अर्चना कुडचे यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.