पश्चिम महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात सुवर्णक्षण; ‘श्रद्धा इन्स्टिट्यूट’च्या २१ विद्यार्थ्यांची IIT तर २१ विद्यार्थ्यांची NIT मध्ये निवड

इचलकरंजी :विजय मकोटे

दि.१८ जुलै २०२६ : राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत ‘श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट’ने पश्चिम महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात नवा इतिहास घडविला आहे. संस्थेच्या २१ विद्यार्थ्यांनी देशातील प्रतिष्ठित आय आय टी  मध्ये, २१ विद्यार्थ्यांनी    मध्ये तर ९ विद्यार्थ्यांनी आय आय आय टी  मध्ये प्रवेश निश्चित केला आहे. तसेच तब्बल ८० विद्यार्थ्यांनी ९९ पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवत अभूतपूर्व यश मिळविल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.


या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. माणिकराव साळुंखे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ए. आर. तांबे होते. यावेळी प्रा. लक्ष्मण केरिपाळे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रा. माणिकराव साळुंखे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, हा सत्कार केवळ गुणवत्तेचा नसून विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या शिस्तीचा, चिकाटीचा आणि अथक परिश्रमाचा गौरव आहे. ज्ञान, कठोर परिश्रम आणि उत्तम चारित्र्य या त्रिसूत्रीवर विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उभारावे, असे आवाहन त्यांनी केले.
आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, मशीन लर्निंग आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या विकासाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखत विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग मानवकल्याणासाठी व्हावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील कौशल्याधारित शिक्षणाचा लाभ घेऊन जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी विद्यार्थी सक्षम बनावेत, असेही त्यांनी नमूद केले.


सोहळ्यादरम्यान आय आय टी,एन आय टी, आय आय आय टी  तसेच ९९ पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळविणाऱ्या सर्व ८० विद्यार्थ्यांचा पारंपरिक महाराष्ट्रीयन फेटा बांधून, गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या मुलांच्या यशाने भारावलेल्या पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. “आम्ही घेतलेल्या कष्टाचे आज चीज झाले,” अशा भावना अनेक पालकांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष ए. आर. तांबे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पालकांचा विश्वास, प्राध्यापकांचे समर्पण आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीमुळे हे यश शक्य झाल्याचे सांगितले. समन्वयक सुप्रिया कोंडोळे, संगीता पवार, अभिषेक तांबे, सृष्टी तांबे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या भव्य सत्कार सोहळ्याने ‘श्रद्धा इन्स्टिट्यूट’ने पुन्हा एकदा सिद्ध केले की, जिथे जिद्द, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण परिश्रम असतात, तिथे यशाचा इतिहास घडतच असतो.