श्रीराम मंदिर दानपेटी लुटीप्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी; इचलकरंजीत महाविकास आघाडीचे आंदोलन

इचलकरंजी :विजय मकोटे 

दि.१८ जुलै २०२६: अयोध्येतील श्रीराम मंदिर दानपेटी लुटीप्रकरणातील प्रमुख आरोपी चंपतराय व अनिल मिश्रा यांना तात्काळ अटक करून या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी इचलकरंजी शहर महाविकास आघाडीच्या वतीने गांधी पुतळा येथे निदर्शने करण्यात आली.


याप्रसंगी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हनुमान मंदिरात जाऊन श्री हनुमानाची पूजा-अर्चा केली. त्यानंतर झालेल्या आंदोलनात विविध पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना मदन कारंडे व शशांक बावचकर यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर दानपेटी लुटीप्रकरणाचा निषेध व्यक्त केला.

या घटनेमुळे देशातील १४० कोटी जनतेच्या श्रद्धेचा व विश्वासाचा घात झाला असून, लोकांच्या धार्मिक भावना आणि श्रद्धेशी खेळण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सर्व संबंधित आरोपींना तातडीने अटक करावी तसेच त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. आंदोलनाच्या शेवटी संबंधित मागण्यांचे निवेदन शासनाकडे पाठविण्यात आले.