महापौरांच्या आश्वासनानंतर फेरीवाला संघटनेचे आमरण उपोषण मागे

इचलकरंजी, : हबीब शेखदर्जी 
दि.२५: जुलै २०२६: इचलकरंजी शहरातील शिवतीर्थ परिसरातील फेरीवाल्यांच्या गाळ्यांच्या प्रश्नावरून फेरीवाला संघटनेच्या वतीने २२ जुलै २०२६ पासून सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण अखेर महापौरांच्या सकारात्मक आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.या प्रश्नासंदर्भात आज महापौर उदय धातुंडे यांनी फेरीवाला संघटनेचे पदाधिकारी, उपोषणकर्ते आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. चर्चेदरम्यान शिवतीर्थ परिसरातील फेरीवाल्यांसाठी पर्यायी जागेची व्यवस्था करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत त्यांनी योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.महापौरांच्या आश्वासनावर विश्वास व्यक्त करत फेरीवाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि उपोषणकर्त्यांनी २४ जुलै २०२६ रोजी आपले सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेतले.

           यावेळी बोलताना महापौर उदय धातुंडे यांनी फेरीवाल्यांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनामार्फत त्यांच्यासाठी योग्य व पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट केले.यानंतर महापौर उदय धातुंडे, सभागृह नेते विठ्ठल चोपडे, परिवहन सभापती अरुणा बचाटे, मागासवर्गीय सभापती रुबेन आवळे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत पाजून उपोषण सोडण्यात आले.यावेळी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, शहाजी भोसले, भाऊसो आवळे, शशिकांत मोहिते, प्रमोद बचाटे तसेच अन्य नगरसेवक आणि फेरीवाला संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.