कोल्हापूर,: प्रविण भोसले
दि.२५ जुलै २०२६ : दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील सामाजिक शास्त्रे विभागांच्या अभ्यास मंडळाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. यानिमित्त आयोजित व्याख्यानात शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख तथा महावीर अध्यासनाचे समन्वयक डॉ. विजय काकडे यांनी “समाजशास्त्राचा अभ्यास का करावा?” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते. तसेच श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांचे कार्यक्रमासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. मार्गदर्शन करताना डॉ. विजय काकडे म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे रोजगाराच्या संधींचे स्वरूप बदलत आहे. सामाजिक शास्त्रांच्या क्षेत्रातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतर सामाजिक शास्त्रांचा सखोल अभ्यास करून विद्यार्थ्यांनी स्वतःला सक्षम बनवावे. बदलत्या काळातील नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी कौशल्यविकास आणि अभ्यासातील सातत्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आयक्यूएसी समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. पी. पी. भाटे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. ए. बी. बलुगडे यांनी आभार मानले.यावेळी डॉ. के. एम. देसाई, डॉ. डी. के. वळवी, डॉ. डी. एल. काशीद-पाटील, डॉ. एस. व्ही. शिखरे, डॉ. सुनिता राठोड, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.