नांदणी येथे मुस्लिम शैक्षणिक व्यासपीठाचा भव्य उद्घाटन समारंभ; प्रा. तौहीद मुजावर यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

नांदणी, ता. शिरोळ: कयूम शेख
दि.२६ जुलै २०२६ : नांदणी येथे मुस्लिम शैक्षणिक व्यासपीठाच्या भव्य उद्घाटन समारंभाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. महाराष्ट्रातील प्रख्यात करिअर कौन्सिलर व यशस्वी प्लेसमेंट ऑफिसर प्रा. तौहीद मुजावर यांच्या हस्ते व्यासपीठाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअर नियोजन आणि व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमएमएनएफचे अध्यक्ष झाकीर शिकलगार होते. तर सदिक जमादार (इचलकरंजी), जाफर मुजावर तसेच मुल्ला सर (यड्राव) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

             मार्गदर्शन करताना प्रा. तौहीद मुजावर म्हणाले, “उच्च शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व घडवण्याची, विचारसरणी समृद्ध करण्याची आणि समाजाला दिशा देण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने ज्ञान, शिस्त आणि सातत्य यांच्या बळावर स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवावे.”

                  यावेळी नांदणी गावातील विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, करिअर घडवण्यासाठी आणि योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रा. मुजावर यांनी मार्गदर्शन करत मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि आधुनिक शिक्षणाच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

                कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुस्लिम शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून समाजात शिक्षणप्रसार, करिअर मार्गदर्शन आणि शैक्षणिक जनजागृतीचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविले जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे आयोजन मुस्लिम शैक्षणिक व्यासपीठ, नांदणी यांच्या वतीने करण्यात आले. उद्घाटन समारंभ यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.