बहुभाषिकता ही व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली – प्रा. हेमंत पाटील

शहाजी महाविद्यालयात भाषा अभ्यास मंडळ उद्घाटन सोहळा संपन्न

कोल्हापूर :प्रविण भोसले 

दि.२६ जुलै २०२६ : दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा विभागांच्या संयुक्त विद्यमाने भाषा अभ्यास मंडळ उद्घाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त आयोजित व्याख्यानात महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथील इंग्रजी विभागाचे प्राध्यापक हेमंत पाटील यांनी “बहुभाषिकता : व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. शानेदिवाण होते. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांचे कार्यक्रमासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

             मार्गदर्शन करताना प्रा. हेमंत पाटील म्हणाले की, आजच्या जागतिक युगात प्रत्येकाने अनेक भाषा आत्मसात करणे आवश्यक आहे. चार किंवा त्यापेक्षा अधिक भाषा अवगत असलेल्या व्यक्तीला बहुभाषिक म्हणतात. इंग्रजी ही आज जगभर संपर्क आणि ज्ञानाची महत्त्वाची भाषा बनली असून विविध भाषा शिकल्याने व्यक्तीची विचारशक्ती, आकलन क्षमता आणि ज्ञान संपादन करण्याची क्षमता वाढते. तसेच रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होऊन व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधला जातो. भाषा कोणतीही असली तरी भावना सर्व भाषांमध्ये समान असतात. त्यामुळे विविध भाषांचा आदर करणे, त्या शिकणे आणि त्यांचा योग्य वापर करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

           अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आर. शानेदिवाण यांनी बहुभाषिकतेचे महत्त्व विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुन्शी प्रेमचंद आणि आचार्य विनोबा भावे यांसारख्या महान व्यक्तींना एकापेक्षा अधिक भाषांचे ज्ञान होते. विविध भाषांवरील प्रभुत्वामुळे त्यांना विविध विषयांचे सखोल ज्ञान मिळाले, विविध संस्कृतींची ओळख झाली आणि समाजाला बहुमोल विचार देणे शक्य झाले, असे त्यांनी सांगितले.

              यावेळी “बहुभाषिकता : व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली” या विषयावरील भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले. तसेच मराठी विभागाचे ‘माय मराठी अभ्यास मंडळ’, इंग्रजी विभागाचे ELLA अभ्यास मंडळ आणि हिंदी विभागाचे ‘हिंदी अध्ययन मंडल’ यांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विभागप्रमुख डॉ. डी. के. वळवी यांनी स्वागत केले. डॉ. एस. एस. पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. पल्लवी कोडक, डॉ. सारिका कांबळे आणि प्रा. स्नेहल भोसले यांनी सूत्रसंचालन केले, तर इंग्रजी विभागप्रमुख डॉ. एन. एस. जाधव यांनी आभार मानले.

      यावेळी आयक्यूएसी समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर, डॉ. ए. बी. बलुगडे, परीक्षा विभागप्रमुख डॉ. के. एम. देसाई, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.