श्री दत्त उद्योग समूहाचे विविध उपक्रम शेतकरी हिताचे व राज्यातील साखर उद्योगासाठी मार्गदर्शक : साखर आयुक्त डॉ. संजय कोलते

शिरोळ: कयुम शेख 

दि.२७ जुलै २०२६  : राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सपत्नीक श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना व दत्त उद्योग समूहास भेट देऊन विविध प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी शेतकरी हितासाठी राबविण्यात येणाऱ्या ऊस विकास योजना, पर्यावरणपूरक उपक्रम आणि ग्रामीण विकासाच्या अभिनव संकल्पनांचे त्यांनी विशेष कौतुक केले. श्री दत्त उद्योग समूहाचे विविध उपक्रम राज्यातील साखर उद्योगासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

            भेटीची सुरुवात श्रीवर्धन बायोटेक येथे झाली. येथे त्यांनी थेट ऊस शेतीची पाहणी करत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुपर केन नर्सरीची माहिती घेतली. ऊस रोपवाटिकेची कार्यपद्धती समजून घेत त्यांनी स्वतः ऊस लागवड केली. तसेच आंबा लागवड, हळद ग्रीनहाऊस यांची पाहणी करून ऊस शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि एकरी १५० टन ऊस उत्पादनक्षमतेबाबत सविस्तर माहिती घेत मार्गदर्शन केले.

त्यानंतर त्यांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला भेट देऊन साखर निर्मिती प्रक्रिया, मिल विभाग, कोजनरेशन प्रकल्प, दवाखाना, महाविद्यालय तसेच इतर विविध विभागांची पाहणी केली. कारखान्याची कार्यपद्धती, स्वच्छता, तांत्रिक प्रगती आणि शेतकरी हिताच्या विविध योजनांची माहिती घेत त्यांनी समाधान व्यक्त केले.यानंतर शिरोळ येथील क्षारपडमुक्त प्रकल्पाची पाहणी करत हा अभिनव उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक असल्याचे सांगितले. हा प्रकल्प राज्यभर राबविण्याची गरज असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

       त्यानंतर शेडशाळ येथील देशी बीज बँकेला भेट देऊन देशी वाणांच्या बियाण्यांचे संवर्धन, जतन आणि प्रसार ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा उपक्रमांना शासनाकडून अधिक बळ मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.भेटीच्या पुढील टप्प्यात त्यांनी आलास येथील आलमखान पठाण पाणीपुरवठा संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन सामूहिक पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या ठिबक सिंचन योजनेची माहिती घेतली. पाणी बचत, कार्यक्षम सिंचन आणि शेतीतील उत्पादकता वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असून अशा योजनांना आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

        यावेळी प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर उज्ज्वला पळसकर, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालक मंडळाचे सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण भेटीदरम्यान डॉ. संजय कोलते यांनी श्री दत्त उद्योग समूहाने शेती, पर्यावरण, जलसंवर्धन, बीजसंवर्धन आणि ग्रामीण विकासासाठी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक करत, हे मॉडेल राज्यातील इतर साखर कारखान्यांसाठीही प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असल्याचे मत व्यक्त केले.