शिरोळ: कयुम शेख
दि. २७ जुलै २०२६ : राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सोमवारी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना व श्री दत्त उद्योग समूहास सदिच्छा भेट देऊन कारखान्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी, पर्यावरणपूरक व शेतकरी हिताच्या उपक्रमांची पाहणी केली. या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ होत असून, श्री दत्त उद्योग समूहाचे कार्य राज्यातील साखर उद्योगासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
भेटीदरम्यान डॉ. कोलते यांनी सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान, बेणे लागवड, सच्छिद्र निचरा पद्धतीद्वारे क्षारपड जमिनीचा विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ऊस लागवड, ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर, इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (ETP), सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट (STP), पर्यावरण प्रयोगशाळा, माती परीक्षण प्रयोगशाळा, आरोग्य केंद्र तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाची पाहणी केली. यानंतर सभागृहात कारखान्याचा माहितीपट आणि क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाचे सादरीकरण दाखविण्यात आले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी स्वागत करून कारखान्याच्या गाळप हंगामासह ऊस विकास, शेती आधुनिकीकरण, पर्यावरण संवर्धन आणि शेतकरी कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. या सर्व उपक्रमांची माहिती घेतल्यानंतर डॉ. कोलते यांनी कारखान्यामार्फत शेतीविषयक उपक्रम प्रभावीपणे राबविले जात असल्याने शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच कारखाना परिसर स्वच्छ व पर्यावरणपूरक ठेवल्याबद्दल व्यवस्थापनाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यानंतर त्यांनी शिरोळ येथील सभासद शेतकरी विजय रघुनाथ कवठेकर आणि बकुळ सुरेंद्र बेळुंके यांच्या शेतावर भेट देऊन क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच औरवाड येथील सभासद संजय कोल्हे, मनोहर गावडे आणि चंद्रकांत गावडे यांच्या ऊस प्लॉटला भेट देऊन आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञानाची माहिती घेतली.उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या डॉ. अप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील महिला फाउंडेशन बीज बँकेला भेट देत त्यांनी विविध देशी बियाण्यांची माहिती घेतली व महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच आलास येथील कै. आलमखान पठाण कृष्णा सहकारी पाणीपुरवठा संस्था येथे भेट देऊन १,७०० एकर प्रस्तावित क्षेत्रापैकी ४०० एकरांवर कार्यान्वित असलेल्या ठिबक सिंचन योजनेची पाहणी केली. संस्थेच्या आधुनिक कार्यपद्धतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील, प्रादेशिक सहसंचालक (साखर) उज्ज्वला पळसकर, संचालक मंडळाचे सदस्य, कामगार प्रतिनिधी, सचिव अशोक शिंदे, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगण्णा, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, क्षारपड जमीन सुधारणा योजनेचे प्रोजेक्ट इंजिनिअर कीर्तीवर्धन मरजे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.डॉ. कोलते यांनी शेवटी श्री दत्त उद्योग समूहाने कृषी विकास, जलसंधारण, पर्यावरण संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकरी हितासाठी उभारलेले उपक्रम राज्यातील इतर साखर कारखान्यांसाठी आदर्श ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.