आधुनिक तंत्रज्ञानाने इचलकरंजी होणार ‘खड्डेमुक्त’

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ‘इन्स्टा रोड पॅचर’चा प्रयोग

इचलकरंजी: अन्वर मुल्ला 

दि. ३ : विघ्नहर्ता श्री गणरायाच्या आगमनापूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे जलद आणि टिकाऊ पद्धतीने बुजविण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. दाब संवेदनशील साहित्याच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पॅचवर्कचे प्रात्यक्षिक गुरुवारी गावभागातील जुना फडणीस हौद चौकात घेण्यात आले. आमदार राहुल आवाडे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी या प्रात्यक्षिकाची पाहणी केली.शहरातील मुख्य मार्गांसह विविध भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने अत्याधुनिक पॅचवर्क तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार राहुल आवाडे यांच्या संकल्पनेतून या आधुनिक पद्धतीचा प्रत्यक्ष डेमो घेण्यात आला.

             ‘इन्स्टा रोड पॅचर’च्या माध्यमातून दाब संवेदनशील साहित्याचा वापर केला जात असल्याने रस्त्यावरील खड्डे अवघ्या काही मिनिटांत बुजविणे शक्य होते. या पद्धतीसाठी ट्रक, डंपर किंवा मोठ्या रोलरसारख्या अवजड यंत्रसामग्रीची आवश्यकता नसून कमी मनुष्यबळात काम पूर्ण करता येते. विशेष म्हणजे पॅचवर्क केल्यानंतर रस्ता थंड होण्याची प्रतीक्षा करावी लागत नसल्याने दुरुस्ती केलेला रस्ता तत्काळ वाहतुकीसाठी खुला करता येतो.

           एका खड्ड्याच्या पॅचवर्कसाठी सुमारे दहा मिनिटांचा कालावधी लागतो. या तंत्रज्ञानाद्वारे केलेली दुरुस्ती किमान एक वर्ष टिकण्याची क्षमता असल्याने वारंवार होणाऱ्या रस्ते दुरुस्तीवरील खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते. पारंपरिक पद्धतीने केलेल्या पॅचवर्कनंतर काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असतात. त्यामुळे रस्त्यांची टिकाऊ दुरुस्ती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

         गणेशोत्सवाला लवकरच सुरुवात होत असून गणेश चतुर्दशीपूर्वी शहरातील प्रमुख मार्गांवरील खड्डे बुजवून ‘खड्डेमुक्त इचलकरंजी’ करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आमदार राहुल आवाडे यांनी सांगितले.यावेळी सभागृह नेते विठ्ठल चोपडे, आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी सभापती सतीश मुळीक, नगरसेविका सौ. विद्या साळुंखे, सौ. अरुणा बचाटे, प्रभाग समिती अध्यक्ष सुशांत कलागते, रवी रजपुते, योगेश पाटील, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, शेखर शहा, राहुल घाट, अनिकेत पाटील आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.