रत्नागिरी: सचिन पाटोळे
दि. ३ : जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव दाखल करण्यासाठी रद्द केलेली फेरफार नोंद मंजूर करण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिपळूणचे मंडळ अधिकारी उमेश राजाराम राजेशिर्के (वय ५२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील पाग नाका, पॉवर हाऊस परिसरात करण्यात आली. महिनाभरातील रत्नागिरी एसीबीची ही दुसरी कारवाई आहे.
तक्रारदाराने मौजे चिपळूण येथील भूमापन क्रमांक १७४/१अ ही जागा खरेदी केली होती. सदर जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर स्वतःचे व पत्नीचे नाव दाखल होऊन फेरफार नोंद मंजूर व्हावी, यासाठी त्यांनी ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे अर्ज केला होता. त्यानुसार ११ जून २०२६ रोजी फेरफार नोंद करण्यात आली होती. मात्र, मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के यांनी ८ जुलै २०२६ रोजी सदर नोंद रद्द केली.
यानंतर तक्रारदाराने २ ऑगस्ट रोजी महसूल कर्मचारी पतसंस्थेत राजेशिर्के यांची भेट घेतली. त्यावेळी रद्द झालेली फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी राजेशिर्के यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर २३ व २७ ऑगस्ट रोजी फोन करून फेरफार नोंद मंजूर केल्याचे सांगत लाचेच्या रकमेसाठी तगादा लावल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
गाडीतच स्वीकारली लाच
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २ सप्टेंबर रोजी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली. तक्रारीची पडताळणी भोगाळे येथील दीपक लॉजसमोर तक्रारदाराच्या गाडीत पंचांसमक्ष करण्यात आली. त्यावेळी लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर सायंकाळी ६.०५ वाजता पाग नाका, पॉवर हाऊस परिसरातील मुंबई-गोवा महामार्गावर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराच्या गाडीत येऊन पंचांसमक्ष १० हजार रुपयांची रोख लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के यांना रंगेहात ताब्यात घेतले.या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील व अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. रत्नागिरी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे तसेच अंमलदार उदय चांदणे, संजय वाघाटे, जनार्दन पवार, आशिष बल्लाळ, श्रेया विचारे, हेमंत राजेश गावकर, समिता क्षिरसागर व अजिंक्य पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
लाचेची मागणी झाल्यास संपर्काचे आवाहन
कोणत्याही शासकीय कामासाठी अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ७०३८३९१०६४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर माहिती देता येणार आहे