पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शहापूर खणीमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करावे

"श्री गणरायाला पर्यावरण पूरक निरोप देवुया" आयुक्त पल्लवी पाटील यांचे इचलकरंजी शहरवासीय व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन

इचलकरंजी : अन्वर मुल्ला 

दि.३: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील नागरिकांनी आपल्या घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन शहापूर खणीमध्ये करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.गेल्या काही वर्षांपासून इचलकरंजी शहरातील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी शहापूर खणीची व्यवस्था करण्यात येत आहे. यंदा पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहिल्याने शहापूर खणीमध्ये दरवर्षीच्या तुलनेत अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. तथापि,सद्यस्थितीत खणीमध्ये सुमारे १५ फूट पाण्याची पातळी असल्याने घरगुती गणेश मूर्ती त्याच बरोबर ६ ते ८ फुट उंचीच्या सार्वजनिक गणेश मुर्तींचे विसर्जन शहापूर खणीमध्ये होवू शकते. त्यामुळे शहापूर खणीमध्ये गणेश मूर्ती विसर्जन होणार की नाही याबाबत नागरिकांनी आपल्या मनात कोणताही संभ्रम न ठेवता शहापूर खणीमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करून महानगरपालिकेच्या पर्यावरण पूरक गणेशोत्सवास सहकार्य करावे अशी विनंती महानगरपालिकेच्या वतीने करणेत येत आहे.


या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी उपायुक्त नंदु परळकर, मानसेवी शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर, शहर अभियंता बाजीराव कांबळे, सहा.आरोग्य अधिकारी मंगेश दुरुगकर, पर्यावरण अधिकारी पियुष जाधव, आपत्ती व्यवस्थापनाचे संजय कांबळे यांच्या समवेत शहापूर खण परिसरास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. गणेशमूर्तींचे विसर्जन सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावे, यासाठी खण परिसराची स्वच्छतेसह आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

त्याचबरोबर महानगरपालिका प्रशासनाकडून उपलब्ध असलेल्या अन्य पर्यायांच्या माध्यमातून शहापूर खणीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विसर्जनाच्या अनुषंगाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

शहरातील नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेला सहकार्य करून आपल्या घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन शहापूर खणीमध्ये करावे. तसेच शहरातील ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींची उंची ६ ते ८ फूट आहे, अशा मंडळांनीही आपल्या गणेशमूर्तींचे विसर्जन शहापूर खणीमध्ये करावे, असे आवाहन आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.

“पर्यावरणाचे संवर्धन आणि गणेशमूर्तींचे नियोजनबद्ध विसर्जन यासाठी नागरिक व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहनही महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.