गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील वाहतुकीत बदल

इचलकरंजी: अन्वर मुल्ला 

दि . २२ : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणात निघणार आहेत. मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने शहरातील वाहतुकीत बदल केले आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक नीलोत्पल भा.पो.से. यांनी १६ सप्टेंबर रोजी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनाची मुख्य मिरवणूक शाहू पुतळा–शिवतीर्थ–जनता चौक–गांधी पुतळा–झेंडा चौक–मरगुबाई मंदिर चौक–नदी घाट या मार्गाने जाणार आहे. या मार्गावर तसेच जोडरस्त्यांवरून येणाऱ्या वाहनांना प्रवेश आणि वाहन पार्किंग करण्यास बंदी राहणार आहे.


सांगली व जयसिंगपूरकडून यड्राव फाटामार्गे इचलकरंजीत येणाऱ्या वाहनांना राजवाडा, गांधी पुतळा, जनता चौक, हवामहल बंगला, शिवतीर्थ या मार्गावर प्रवेश बंद राहील. या वाहनांसाठी फॉर्च्युन प्लाझा (बिग बाजार) येथून लालनगर, थोरात चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, एसटी स्टँड, शाहू पुतळा असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
कुरुंदवाड, अब्दुललाट, शिरढवाड, हुपरी, कागल, निपाणी तसेच कर्नाटकातून येणारी वाहतूक पंचगंगा पुलावरून इचलकरंजी शहरात येण्यास बंदी राहणार आहे. या वाहनांनी पट्टणकोडोली–इंगळी–रुई पूल–कबनूर मार्गाचा वापर करावा. तसेच कुरुंदवाड, बोरगाव व कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांसाठी अब्दुललाट–हेरवाड–कुरुंदवाड–शिरढोण–टाकवडे–महासत्ता चौक–थोरात चौक–आंबेडकर पुतळा असा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
हे वाहतूक निर्बंध २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक पूर्ण होईपर्यंत लागू राहतील. मिरवणूक संपल्यानंतर संबंधित मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.