इचलकरंजी : विजय मकोटे
दि.२३ : शहरातील कलानगर परिसरात रात्री उशिरापर्यंत विनापरवाना लाऊडस्पीकर सुरू ठेवल्याप्रकरणी गणेश मंडळाच्या अध्यक्षाविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी रात्री ११.५० वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची गस्त सुरू असताना नवीन पोलिस वसाहतीजवळील कलानगरचा महागणपती मंडळाजवळ विनापरवाना ध्वनीक्षेपक सुरू असल्याचे निदर्शनास आले. मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गजानन मांगलेकर (वय ६०, रा. कलानगर, इचलकरंजी) यांनी मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या गिरीश कुलकर्णी यांच्या शास्त्रीय संगीत कार्यक्रमासाठी हा लाऊडस्पीकर लावला होता.
रात्री १० वाजल्यानंतरही कोणतीही परवानगी न घेता ध्वनीक्षेपक सुरू ठेवून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १३५ अन्वये लागू आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मांगलेकर यांच्यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अंमलदार शुभम कृष्णात पाटील यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ८०२/२०२६ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने करीत आहेत.