वस्त्रोद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी India ITME 2026 आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला भेट द्या; अशोक स्वामी यांचे उद्योजकांना आवाहन

मुंबई :अजमल खान 

दि.२२: वस्त्रोद्योग क्षेत्रात सातत्याने होत असलेले तांत्रिक बदल, आधुनिक यंत्रसामग्री, उत्पादनक्षमता वाढ आणि जागतिक बाजारपेठेतील संधी यांची माहिती देशातील वस्त्रोद्योग उद्योजकांना मिळावी, यासाठी ४ ते ९ डिसेंबर २०२६ या कालावधीत ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) येथे India ITME 2026 आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग यंत्रसामग्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला देशातील उद्योजकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक म. स्वामी यांनी केले आहे.
या प्रदर्शनात वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित आधुनिक यंत्रसामग्री, सूत निर्मिती, कापड विणकाम, कापड प्रक्रिया, तयार कपडे निर्मिती तसेच विविध उत्पादन तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
वस्त्रोद्योग क्षेत्रात उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादनाची गुणवत्ता सुधारणे आणि उत्पादनक्षमता वाढविणे ही उद्योजकांसमोरील महत्त्वाची आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर प्रदर्शनात नवीन यंत्रसामग्री, ऊर्जा बचतीची साधने, स्वयंचलित यंत्रणा आणि आधुनिक उत्पादन प्रणालींची माहिती मिळणार आहे. त्याचा उपयोग उद्योगांच्या आधुनिकीकरणासाठी होऊ शकतो.
या प्रदर्शनामुळे देश-विदेशातील यंत्रसामग्री उत्पादक, तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिनिधी आणि वस्त्रोद्योग व्यावसायिकांशी संपर्क साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. बदलत्या औद्योगिक परिस्थितीत नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार, गुंतवणुकीच्या संधी आणि जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेचा अभ्यास करण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे.
दरम्यान, ५ व ६ डिसेंबर रोजी वस्त्रोद्योगाच्या भविष्यातील वाटचालीवर आधारित विशेष उद्योग परिषद आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये वस्त्रोद्योगातील प्रमुख उद्योजकांची परिषद, तांत्रिक पुरस्कार वितरण, व्यावसायिक संपर्क मेळावा तसेच वरिष्ठ निर्णयकर्त्यांशी संवाद आणि विचारांची देवाणघेवाण असे उपक्रम होणार आहेत.
देशासह महाराष्ट्रात सहकारी व खासगी सूतगिरण्या, यंत्रमाग उद्योग, कापड प्रक्रिया उद्योग आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित अनेक व्यावसायिक कार्यरत आहेत. या सर्व घटकांनी प्रदर्शनाला भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी, आपल्या उद्योगाच्या गरजेनुसार नवीन यंत्रसामग्रीचा अभ्यास करावा आणि जागतिक बाजारपेठेतील बदल समजून घ्यावेत, असे आवाहन स्वामी यांनी केले आहे.
प्रदर्शनाचा वेळ तारीख ठीकाण: ४ ते ९ डिसेंबर २०२६, भारतीय प्रदर्शन केंद्र, ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश. वस्त्रोद्योग विशेष परिषद ५ व ६ डिसेंबर रोजी होणार आहे.