नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

*पीएसआय विश्वजीत गाढवे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित; तीन दिवस विविध क्रीडा स्पर्धांचा थरार*

सांगली  :मयुरी देशपांडे

दि21:* सूरज फाऊंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. महात्मा गांधी पोलीस कार्यालय, मिरज येथील पीएसआय श्री. विश्वजीत गाढवे यांच्या हस्ते सर्वप्रथम क्रीडांगणाचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे तालुका, जिल्हा, विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ४०० मीटर धावून क्रीडा ज्योत मैदानात आणण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुणे व सर्व खेळाडूंच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. खेळाडूंनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत शानदार मार्चपास सादर केला. यावेळी सर्व खेळाडूंनी क्रीडा स्पर्धेची शपथ घेतली.

कार्यक्रमाच्या स्वागत व प्रास्ताविक भाषणात नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमचे प्रभारी प्राचार्य श्री. प्रशांत चव्हाण यांनी सूरज फाऊंडेशनने शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याची सविस्तर माहिती दिली. या वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये १०० मीटर, ४०० मीटर धावणे, रिले, खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल, फुटबॉल, रिंग, कॅरम, बुद्धिबळ, जलतरण रिले, व्हॉलीबॉल व डॉजबॉल अशा विविध खेळांचा समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी पाहुण्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांचे चार गट तयार करण्यात आले असून, प्रत्येक गटाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक नृत्यामुळे कार्यक्रमात विशेष रंगत आली.

प्रमुख पाहुणे पीएसआय श्री. विश्वजीत गाढवे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात किमान एका खेळाचा सातत्याने सराव करून त्यामध्ये प्रावीण्य मिळवावे, असे आवाहन केले. खेळामुळे शरीर सुदृढ राहते. त्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, योग्य नियोजन आणि वेळेवर अभ्यास या गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी खेळाच्या माध्यमातून आपले भविष्य घडवावे आणि चांगले खेळाडू तयार करण्याची नव कृष्णा व्हॅली स्कूलची परंपरा कायम राखावी, असे मत व्यक्त केले. नव कृष्णा व्हॅली स्कूल हे क्रीडा क्षेत्रातील एक स्पोर्ट्स हब असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

आभार प्रदर्शनात स्पोर्ट्स इन्चार्ज श्री. विनायक जोशी यांनी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे महत्त्व विशद केले. या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त क्रीडा गुण ओळखून त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देणे, भविष्यातील उत्कृष्ट खेळाडू घडविणे आणि प्रशिक्षकांना गुणवंत खेळाडू निवडण्याची संधी देणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने सर्व खेळ प्रकारांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन करून प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.यावेळी सूरज फाऊंडेशनचे सचिव श्रीशैल मोटगी, नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमचे प्राचार्य अधिकराव पवार, सूरज फाऊंडेशनचे ॲडमिन ऑफिसर रघुनाथ सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

या वार्षिक क्रीडा स्पर्धा दिनांक २, ३ व ४ नोव्हेंबर २०२६ अशा तीन दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आल्या असून, विविध खेळांमधून विद्यार्थ्यांना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे.