महापौरांनी स्वतःच उचलला कचरा; सफाई कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाचा पंचनामा!

घंटागाडीवर कर्मचारी गायब, हेल्परची कामास टाळाटाळ; अस्वच्छता पाहून महापौर उदय धातुंडे संतप्त

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी

दि .21: शहर स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांकडूनच कर्तव्यात कसूर होत असल्याचा धक्कादायक प्रकार महापालिकेच्या स्वच्छता पाहणीदरम्यान समोर आला. शहरातील अस्वच्छता, ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि घंटागाडीच्या कामकाजातील अनागोंदी पाहून महापौर उदय धातुंडे यांचा संताप अनावर झाला. विशेष म्हणजे, घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा अनुभव आल्यानंतर महापौरांनी कोणाचीही वाट न पाहता स्वतःच रस्त्यावरील कचरा उचलून घंटागाडीत टाकला. या प्रकारामुळे सफाई व्यवस्थेतील ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

इचलकरंजी शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या उद्देशाने महापौर, उपमहापौर, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली. शहरातील विविध भागांत पाहणी करताना अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छतेचे चित्र दिसून आले. सफाई कर्मचाऱ्यांच्या कामातील अनियमितता आणि निष्काळजीपणा पाहून महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना धारेवर धरताना महापौरांनी कामचुकार कर्मचाऱ्यांबाबत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. १५-१५ हजार रुपये वेतन घेऊनही कर्मचारी प्रत्यक्ष काम करत नसतील, तर अशा कामकाजाचा उपयोग काय? काही कामगार कामचुकार आहेत, असे ऐकले होते; मात्र आज प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्याची खात्री पटल्याचे त्यांनी सुनावले.

दरम्यान, घंटागाडीच्या कामकाजाचा अनुभव तर महापौरांच्या संतापात आणखी भर घालणारा ठरला. एका घंटागाडीवरील महिला कर्मचारी मुलाला आणण्यासाठी गेली होती, हेल्पर कचरा उचलण्यास तयार नव्हता, तर चालकही बाहेर गेला होता. परिणामी, घंटागाडी असूनही कचरा संकलनाचे काम ठप्प असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार पाहून महापौरांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावरील कचरा उचलून घंटागाडीत टाकला.

महापौरांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून केलेल्या या कृतीने स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ वेतन घेऊन चालणार नाही, तर नेमून दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, हा स्पष्ट संदेशच या पाहणीमधून देण्यात आला.मात्र, महापौरांच्या एका पाहणीने आणि संतापाने शहराची स्वच्छता व्यवस्था सुधारणार का? कामचुकार कर्मचाऱ्यांवर प्रत्यक्ष कारवाई होऊन स्वच्छतेला शिस्त लागणार का? हा खरा प्रश्न आता इचलकरंजीकरांसमोर आहे.