इचलकरंजी/प्रतिनिधी
दि २१ जानेवारी वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीची अट, 75 पैशांची अतिरिक्त सवलत व अन्य समस्या संदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेऊन योग्य निर्णय घेऊन प्रश्नांची निर्गत करु अशी ग्वाही वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांना दिली.आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांची कर्नाटकातील गदग येथे भेट घेतली.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, राजेश पाटील, सुरेश मगदूम, अमोल कनवाडे, सोनू मगदूम आदींनी श्री. पाटील यांना इचलकरंजी शहरातील वस्त्रोद्योग विशेषत: यंत्रमाग उद्योगाची सध्याची परिस्थिती विषद करत काही तांत्रिक कारणांमुळे ऑनलाईन नोंदणी करताना अडचणी येत असल्याने वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करण्याची मागणी केली. त्याचबरोबर 27 एचपीवरील यंत्रमागधारकांना जाहीर केलेली 75 पैशांची अतिरिक्त सवलतीची अंमलबजावणी करण्यासह यंत्रमाग व्यवसायातील सर्वच समस्या मार्गी लागून हा व्यवसाय संकटातून बाहेर पडावा अशी मागणी केली.
संपूर्ण माहिती घेऊन श्री. पाटील यांनी तातडीने वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. सुमारे पाऊण तास झालेल्या चर्चेत श्री. पाटील यांनी वस्त्रोद्योगातील विशेषत: यंत्रमाग व्यवसायाला भेडसावणारे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर बैठक घेऊन तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत नामदार शेख यांनी पुढील आठवड्यात या प्रश्नी बैठक घेऊन सर्व प्रश्नांची निर्गत करु, अशी ग्वाही दिली आहे.