इचलकरंजी: संजय आंबे
दि. 13 फेब्रुवारी, : अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू श्री शांताराम जाधव व श्री राजू भावसार तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू श्री गणेश शेट्टी यांनी आज इचलकरंजीतील डायनॅमिक स्पोर्ट्स क्लबला भेट दिली.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील या तीन दिग्गज कबड्डी खेळाडूंना एकत्रित पाहण्याची व त्यांना ऐकण्याची संधी मिळाल्याने डायनॅमिक मंडळाचे सर्व खेळाडू, पदाधिकारी, क्रीडाप्रेमी यांच्या चेहऱ्यावरील आनंद आज ओसंडून वाहत होता.मंडळाचे कार्यवाह प्रा. शेखर शहा यांनी हा योग जुळवून आणला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंडळाचे खजिनदार अतुल बुगड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पाहुण्यांना बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रा. शेखर शहा यांनी आपल्या मनोगतात तीनही दिग्गज खेळाडूंचा परिचय करून दिला व त्यांच्या आठवणी सांगताना तत्कालीन काळ सर्वांसमोर उभा केला. या तीनही माजी खेळाडूंच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा इचलकरंजीतील नवोदित खेळाडूंना फायदा व्हावा यासाठी एक योजना आखली असल्याचे त्यांनी सांगितले.श्री शांताराम जाधव यांनी आपल्या मनोगतामध्ये त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठीची पहिली निवड 1975 साली इचलकरंजी येथे झाल्याची आठवण करून दिली. पुन्हा त्याच शहरात येण्याचे, सत्कार स्वीकारण्याचे भाग्य फार थोड्यांना लाभते असे ते म्हणाले. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे आमचे जगण्याचे बळ वृद्धिंगत होते असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. अन्य खेळांप्रमाणे कबड्डी खेळात कोणते साहित्य वापरावे लागत नाही त्यात आपले शरीर हेच आपले मुख्य साहित्य असते असे ते म्हणाले.
राजू भावसार यांनी आपल्या मनोगतामध्ये इचलकरंजीच्या क्रीडा संस्कृतीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. उपस्थित ज्येष्ठ खेळाडूंचा उल्लेख करून नवोदित खेळाडूंनी या जुन्या खेळाडूंकडून विविध कौशल्ये आत्मसात करावीत असे ते म्हणाले.
गणेश शेट्टी यांनी आपल्या मनोगतामध्ये खेळाडूंना सहा गोष्टी आत्मसात कराव्यात असे आवाहन केले. खेळाप्रती निष्ठा, सराव, चिकाटी, सतत शिकण्याची वृत्ती, जिद्द, आत्मविश्वास या सहा गोष्टींच्या सहाय्याने ध्येय साध्य करता येते असे ते म्हणाले.
याप्रसंगी प्रा. डॉ. रतन नाईकनवरे व डॉ. राहुल कुलकर्णी या दोघांनी पीएच. डी. प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मंडळाच्या विकासात योगदान देणाऱ्या विविध पदाधिकाऱ्यांचा, प्रशिक्षकांचा व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध शासकीय व खाजगी संस्थानमधून वरिष्ठ हुद्यांवर कार्यरत असणाऱ्या, निवृत्त झालेल्या मंडळाच्या माजी खेळाडूंचा, प्रशिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रा. शेखर शहा, बाळासाहेब काकडे, दिलीप शिंदे, बाळासाहेब पाटील, अतुल बुगड, प्रा. डॉ. रतन नाईकनवरे, जयपाल हेरलगे, विजय गुरव, बाळासाहेब चव्हाण, डॉ. राहुल कुलकर्णी, अमोल आडसुळे, कल्पेश शहा, राहुल मडके, मोहन भगत, अब्दुल शेख, वासीम बागवान, सोनल बाबर, प्रीती करवा, मयूर चिंदे, अक्षय पोटे, ओंकार खानाज, चंद्रकांत बंडगर इ. मान्यवर तसेच डायनॅमिक स्पोर्ट्सचे उदयोन्मुख मुले, मुली खेळाडू, विद्यार्थी, विद्यार्थिनी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय गुरव यांनी आभार प्रदर्शन केले