इचलकरंजी :प्रतिनिधी
दि. २3 हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन 2021-22 चा 29 वा ऊस गाळप हंगाम कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे आणि ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे संपन्न झाला. हंगाम समाप्तीप्रित्यर्थ कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाो चौगुले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सन्मती चौगुले या उभयतांच्या हस्ते श्री सत्यनारायणाची पूजा करण्यात आली.
कारखान्याच्या 29 व्या ऊस गाळप हंगामासाठी 1 ऑक्टोबर 2021 रोजी बॉयलर अग्निप्रदीपन होऊन 15 ऑक्टोबर रोजी ऊस गाळपास सुरुवात झाली. कारखान्याने चालू हंगामामध्ये 19 लाख 7 हजार 298.162 मे.टन इतके ऊस गाळप केले. या हंगामात कारखान्याकडे एकूण 27 हजार 588 हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली होती. त्यापैकी 19 हजार 121 हेक्टर इतका ऊस हंगामअखेर गाळपासाठी आला. चालू हंगामामध्ये हेक्टरी सरासरी 100 मे.टन इतके ऊस उत्पादन मिळाले. मागील हंगामात ते 103 मे.टन होते. कारखान्याने आजअखेर ऊस विकास योजनेतून खते, बि-बियाणे, तणनाशके, सुक्ष्म अन्नद्रव्ये, ठिबक सिंचन, क्षारपड जमीन अशा माध्यमातून 17 कोटी 72 लाख 48 हजार इतक्या रकमेचे वाटप केले होते. त्यामध्ये 74 लाख 14 हजार 500 इतके अनुदान दिलेले आहे.
या हंगामाकरीता तोडणी वाहतूकीचे ट्रक 23, ट्रॅक्टर 704 मिळून 727 व ट्रॅक्टर टायर गाडी 601, बैलगाडी 625 आणि ऊस तोडणी यंत्रे 40 इतक्या यंत्रणेचा करार झाला होता. त्यापैकी ट्रक 6, ट्रॅक्टर 487, ट्रॅक्टर टायरगाडी 502 व बैलगाडी 435 आणि ऊस तोडणी यंत्रे 34 प्रत्यक्षात कामावर हजर झाले. यामुळे कारखान्यास ऊस पुरवठा होण्यास मदत झाली.
ऊस उत्पादक शेतकर्यांनी आपला ऊस जवाहरकडे गाळपास पाठवून सहकार्य केल्याबद्दल शेतकरी-सभासद, तोडणी वाहतूकदार व मजूर आणि अधिकारी-कर्मचारी-कामगार यांचे कारखाना व्यवस्थापनाने आभार मानले. पुढील हंगामामध्ये या वर्षापेक्षाही अधिक ऊस गाळप होण्यासाठी सर्व सभासद व शेतकर्यांनी आपला ऊस जवाहर कारखान्याकडेच नोंद देऊन गाळपासाठी पाठवावा, असे आवाहनही संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे आणि संचालक आमदार प्रकाश आवाडे यांनी केले.
कार्यक्रमासाठी कारखान्याचे संचालक सर्वश्री आण्णासाहेब गोटखिंडे, सौ. कमल पाटील, सौ. वंदना कुंभोजे, केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे, सुकुमार किणींगे, सुरज बेडगे, संजयकुमार कोथळी, गौतम इंगळे, अभय काश्मिरे, आदगोंडा पाटील, जिनगोंडा पाटील, शितल आमण्णावर, सुमेरु पाटील, दादासो सांगावे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, कामगार प्रतिनिधी सर्जेराव हळदकर तसेच इतर मान्यवर व कारखान्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.