‘माझा ऊसाचा मळा’ उत्पादकता वाढीचे उत्तम गाईड :अशोक बंग यांचे प्रतिपादन

 

शिरोळ : विजय घंगेकर
दि. ३ एप्रिल चार ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी ऊस शेतीतील प्रयोगांच्या विविध कसोट्यांवर आधारित एकरी अधिक उत्पादन कसे घ्यावे, याचे उत्तम गाईड म्हणजे ” माझा ऊसाचा मळा” हे पुस्तक आहे. या पुस्तकामुळे ऊस उत्पादकांना नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाज सेवक अशोक बंग यांनी आज येथे केले. शिरोळच्या दत्त साखर कारखान्यावर आयोजित पुस्तक प्रकशना वेळी ते बोलत होते. कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील प्रमुख उपस्थित होते.
कोल्हापूर कृषी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना आणि तेजस प्रकाशनाने हे पुस्तक केले आहे.
पुस्तकाचे प्रकाशन गणपतराव पाटील, अशोक बंग, ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव, साधनाचे संपादक विनोद शिरसाट, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, मयुरेश शहा, डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, प्रकाशक रावसाहेब पुजारी यांच्या हस्ते झाले.
यावेळी निशिकांत भालेराव, विनोद शिरसाट, डॉ. जमदग्नी यांची भाषणे झाली. रावसाहेब पुजारी यांनी आभार मानले.
यावेळी कारखान्याचे शेती अधिकारी श्रीशैल हेगणा, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, सचिव अशोक शिंदे, मयुरभाई आदी उपस्थित होते.