गोकुळच्‍या तज्ञ व शासन नियुक्‍त संचालकपदी निवड झाल्‍याबद्दल सत्कार

कोल्‍हापूरः प्रतिनिधी
दि.१७मे: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळाच्‍या मिटींगमध्‍ये तज्ञ संचालकपदी युवराज दत्ताजीराव पाटील, विजयसिंह कृष्णाजी मोरे यांची तर शासन नियुक्त संचालक म्हणून मुरलीधर रघुनाथ जाधव यांची नेमणूक झाल्‍याबद्दल चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या हस्‍ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सत्‍कार करण्‍यात आला.

यावेळी चेअरमन विश्‍वास पाटील यांनी ‘ गोकुळ ही कोल्‍हापूर जिल्‍ह्याची आर्थिक वाहिनी आहे. गोकुळमध्‍ये दूध उत्‍पादक हा केंद्रबिंदू मानून कामकाज होत असते. स्‍वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर सा‍हेबांनी कामकाजाचा जो पायंडा पाडला आहे. त्याच पद्धतीने कामकाज सुरू आहे. भविष्‍यात ही तीच परंपरा कायमपणे राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तुम्ही सहकार व सामाजिक क्षेत्रामध्‍ये बरीच वर्षे प्रामाणिकपणे व निस्वार्स्थीपणे काम करीत असल्याने महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री उद्ववजी ठाकरे, ग्रामविकास मंत्री नाम. हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी तुम्‍हा सर्वांची गोकुळच्‍या संचालकपदी नियुक्‍ती केली आहे. याचा वापर संघाच्‍या उन्‍नतीसाठी व दूध उत्‍पादकांना न्‍याय देण्‍यासाठी करावा’असे आवाहन केले. शिवाय पुढील वाटचालीस संचालकांना शुभेच्छा दिल्‍या.

माजी चेअमरन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे म्‍हणाले, ‘ या तिन्‍ही संचालकांच्‍या निवडीचा संघाच्‍या कामकाजात निश्चितच फायदा होईल.’ यावेळी संचालक अजित नरके, शशिकांत पाटील, किसन चौगले यांनी मनोगत व्‍यक्‍त केले.

सत्‍कारास उत्‍तर देताना तज्ञ संचालक युवराज पाटील म्हणाले,‘ गेली २५ ते ३० वर्ष राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. आजपर्यंत सहकारातील व शेतकरी संघ, भूविकास बँक तसेच जिल्‍हा परिषद या क्षेत्रात काम केले आहे. या अनुभवाचा फायदा गोकुळच्‍या कामकाजात निश्चित करू. संघाने दिलेली कोणतीही जबाबदारी आम्‍ही चांगल्‍या पध्‍दतीने पार पाडू’

तज्ञ संचालक विजयसिंह मोरे म्‍हणाले, ‘ गेली अनेक वर्ष बिद्री साखर कारखान्याच्या माध्‍यमातून सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. माझे व गोकुळचे ऋणानुबंध जुने आहेत. संचालक म्‍हणून माझी निवड केल्‍याबद्दल धन्‍यवाद देतो. ज्‍या संस्‍थेमध्‍ये काम करतो त्‍या संस्‍थेसाठी व सभासदांसाठी त्‍यांचा उत्‍कर्ष करण्‍यासाठी आम्‍ही संचालक बांधील राहू.’

शासन नियुक्‍त संचालक मुरलीधर जाधव म्‍हणाले, ‘संघाची प्रगती करण्यासाठी व दूध उत्‍पादकांना न्‍याय देण्‍यासाठी व दूध संकलन वीस लाख लिटर करण्‍यासाठी मी प्रयत्‍नशील राहिन.’

याप्रसंगी संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील, माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले,रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील व संघाचे अधिकारी उपस्थित होते.