संत नामदेव समाज आयोजित आंतरशालेय स्पर्धेत अनंतराव भिडे विद्यामंदिर, मराठी मीडियम हायस्कूलचे सर्वसाधारण विजेतेपद

इचलकरंजी : विजय धुत्रे 
 दि.२४: श्री संत नामदेव महाराजांच्या ६७६ व्या समाधी महोत्सवानिमित्त नामदेव समाजसेवा मंडळाच्या वतीने आयोजित आंतरशालेय स्पर्धांमध्ये प्राथमिक गटात डीकेटीई संस्थेचे अनंतराव भिडे विद्यामंदिर (मराठी माध्यम), तर माध्यमिक गटात मराठी मीडियम हायस्कूल, नारायण मळा यांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.२६ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संत नामदेव भवन येथे चित्रकला, सामान्यज्ञान, बुद्धिबळ, निबंध, वक्तृत्व, पाठांतर, गायन व वेशभूषा आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शहर व परिसरातील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वैयक्तिक व सर्वसाधारण पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी उत्साहात झाला.
        मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ॲड. विश्वनाथ टाळकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष राजन उरूणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. अनिल अवसरे यांनी स्पर्धेचा अहवाल सादर केला.
         ॲड. टाळकुटे यांनी सलग ३६ वर्षे आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल समाजसेवा मंडळाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांच्या माध्यमातून आपल्या कलागुणांना वाव द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सूत्रसंचालन सीमा उरुणकर यांनी केले, तर योगेश पाटूकले यांनी आभार मानले. यावेळी युवक संघटनेचे अध्यक्ष संदीप कल्याणकर, अनंतराव कुडाळकर, उमाकांत कोळेकर यांच्यासह नामदेव समाजसेवा मंडळ, नामदेव युवक संघटना व नामदेव महिला मंडळाचे पदाधिकारी, समाजबांधव, विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.