कोल्हापूर :प्रवीण भोसले
दि.२४: कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी अखंडपणे कार्यरत असणाऱ्या सर्व संस्थांमध्ये श्री बाबासाहेब पाटील भुयेकर यांनी काम केले. या संस्था त्यांनी चांगल्या चालवल्या .या संस्थांमधून त्यांनी माणसं उभी केली आणि कार्यकर्त्यांना बळ दिले असे प्रतिपादन करवीर पंचायत समितीचे माजी सभापती श्री बी.एच.पाटील यांनी केले. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी, कनिष्ठ विभाग व आय क्यू ए सी यांच्या वतीने आयोजित मा. बाबासाहेब पाटील भुयेकर : व्यक्ती व विचार या विषयावर विशेष स्मृती व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक भारत पाटील भुयेकर, उत्तम पाटील भुयेकर, प्रा. डॉ. अरुंधती पाटील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती .श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या व्याख्यान कार्यक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. श्री बी एच पाटील म्हणाले, वडणगे येथील जय किसान क्रीडा मंडळाच्या विकासात बाबासाहेब यांचे मोठे योगदान आहे.गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक, शेतकरी संघ, शाहू छत्रपती शिक्षण संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती या संस्थांमध्ये त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. चारित्र्यसंपन्न राहून त्यांनी माणसं उभी केली. कार्यकर्त्यांना बळ दिले. माझ्यासारखे कार्यकर्ते त्यामुळे उभे राहिले . व्यक्ती म्हणून ते खूप मोठ्या मनाचे व स्पष्ट वक्ते होते.
प्राचार्य डॉ.आर.के .शानेदिवाण म्हणाले, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय व संस्थेच्या विकासात भुयेकर साहेबांचे मोठे योगदान आहे. या संस्थांच्या विकासासाठी त्यांनी आपले सातबारेही गहाण ठेवले.त्यामुळे या महाविद्यालयास अनेक संस्थांच्या इमारती उभ्या राहिल्या. श्रीपतराव बोंद्रे दादांच्या, मा. पी. एन. पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चांगले काम केले.श्री भारत पाटील भुयेकर भैय्या यांनी बाबांच्या कडे नैतिकता व चारित्र्यसंपन्नपणा होता. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी व मार्गदर्शक असे आहेत असे सांगितले.प्राध्यापक प्रबोधिनीचे समन्वय डॉ डी.पी.गावडे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. प्रा. राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले .प्रा सागर चरापले यांनी आभार मानले .यावेळी वरद भुयेकर,सुरेश पवार ,डॉ.आर. डी. मांडणीकर, डॉ.के .एम. देसाई , प्रबंधक रवींद्र भोसले ,अधीक्षक मनीष भोसले, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते .