कोल्हापूर: प्रतिनिधी
दि. १९ जून :प्रसिद्ध उद्योगपती व संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री. संजयजी घोडावत यांना नुकतेच साम मीडिया ग्रुपकडून त्यांच्या औद्योगिक व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ग्लोबल अचिव्हर अवॉर्ड २०२२या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण दुबई याठिकाणी आयोजित करण्यात आले होते परंतु व्यावसायिक कारणास्तव श्री. घोडावत यांना या कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही. मात्र साम मीडिया ग्रुपची पूर्ण टीम संजय घोडावत विद्यापीठात आली व त्यांनी येथे येऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला. या पुरस्काराचे वितरण साम टीव्ही चे मुख्य संपादक प्रसन्न जोशी, सकाळ मीडियाचे डायरेक्टर श्रीराम पवार, साम टीव्ही चे बिझनेस हेड अजित सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. उद्योगपती श्री .संजयजी घोडावत यांनी स्वतः हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
श्री.घोडावत यांनी आजवर एफएमसीजी, विंड टर्बाईन, रिअल इस्टेट, टेक्सटाईल, एविएशन इत्यादी क्षेत्रात यशस्वी उद्योजकाची भूमिका बजावली आहे.
या यशाबद्दल बोलताना ते म्हणाले ” या ग्रुप ने उद्योग क्षेत्रात उत्पादनाच्या बाबतीत गुणवत्ता व दर्जा जपत ग्राहकांना सेवा देण्याचे अविरत कार्य सुरु ठेवले आहे. ग्राहकांची विश्वासाहर्ता टिकवून ठेवण्याचे काम या ग्रुप मधील प्रत्येक घटक करीत आहे. उद्योग व शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक व देश प्रगती नक्कीच साधता येईल. या पुरस्कारामुळे ती जबाबदारी आणखी वाढली आहे.” असे बोलून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
श्री.घोडावत यांना आजवर शिक्षण, उद्योग, कार्पोरेट व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. श्री. संजय घोडावत हे एक यशस्वी उद्योजक आहेत व त्यांचा सामाजिक बांधिलकी आणि लोककल्याण यांवर त्यांचा दृढ विश्वास आहे. आपल्या समाजातील दुर्बल घटकांना सक्षम करून त्यांना चांगले जीवन जगण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या उद्योग व शिक्षण क्षेत्राच्या यशस्वी वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशाबद्दल त्यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे.